४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

By चंद्रकांत शेळके | Published: January 16, 2024 06:20 PM2024-01-16T18:20:19+5:302024-01-16T18:21:01+5:30

गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time | ४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

अहमदनगर : आगामी लोकसभा, विधानसभेच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने मतदारयादी अपडेट करण्याचे काम सध्या सुरू आहे. गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान, १ जानेवारी २०२४च्या अर्हता दिनांकावर जिल्ह्याची मतदारसंख्या आता ३६ लाख ११ हजार ३३ एवढी झाली आहे. ती २२ जानेवारीला सर्वत्र प्रसिद्ध केली जाणार आहे.

२७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी जिल्ह्यात ३५ लाख ७१ हजार ३१२ मतदार होते. तेव्हापासून दोन टप्प्यांत विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. त्यात नवीन ३९ हजार ७२१ मतदारांची भर पडून आता जिल्ह्यात ३६ लाख ११ हजार ३३ मतदार झाले आहेत. तृतीयपंथी, देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी प्रशासनाने विशेष शिबिर राबवून मतदान नोंदणी केले. नव्या मतदारयादीत ११ तृतीयपंथी मतदारांची भर पडून एकूण मतदारसंख्या संख्या १९७ झाली आहे.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. इव्हीएम मशिनसाठी तालुक्याच्या ठिकाणी स्ट्राँग रूम उपलब्ध करून ठेवावे. पोलिंग स्टॉपची माहिती तत्काळ कळवावी. निवडणुकीसाठी मास्टर ट्रेनरची प्रत्येक तालुक्यातून पाच नावे कळवावीत. तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता तालुकास्तरावर करून ठेवावी. प्रत्येक मतदार केंद्रावर जाण्यासाठी व परत मशिन घेऊन येण्यासाठी रूट प्लॅन तयार ठेवावा. इव्हीएम मशिनसाठी तालुका ठिकाणी स्ट्राँग रूम उपलब्ध करून ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिलेल्या आहेत.

हरकतीनंतर आता होणार अंतिम यादी प्रसिद्ध
छायाचित्र मतदार याद्यांच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या अडीच महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. यात प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, मतदार यादी डाटा बेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी मतदार याद्यांची छपाई करणे ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी सर्व मतदान केंद्रांवर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदार?
विधानसभा एकूण मतदार
अकोले २५७५१९
संगमनेर २७५८२१
शिर्डी २७६ ०७२
कोपरगाव २७६७९१
श्रीरामपूर २९८२३०
नेवासा २७१६६६
शेवगाव ३५६४७७
राहुरी ३०७६३२
पारनेर ३३७०७५
अहमदनगर शहर २९४५८५
श्रीगोंदा ३२५०३२
कर्जत-जामखेड ३३४१३३
-------------------
एकूण ३६११०३३

Web Title: 40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.