एकाच दिवसात ४५ अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:51+5:302021-04-10T04:20:51+5:30

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. गुरुवारी दिवसभरात नगर शहरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली. ...

45 funerals in one day | एकाच दिवसात ४५ अंत्यविधी

एकाच दिवसात ४५ अंत्यविधी

अहमदनगर : कोरोनाने जिल्हाभर कहर माजवला आहे. गुरुवारी दिवसभरात नगर शहरात ४५ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली. पहाटेपर्यंत अंत्यविधी सुरू होते. एकाच दिवसात एवढे अंत्यविधी होण्याची ही आजवरची पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी दिवसभर २ हजार २२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्ण अहमदनगर शहरात हलविले जात आहेत. त्यातील मृतांवरही नगर शहरातच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

बुधवारी जिल्ह्यात १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा आकडा गुरुवारी ४५ वर गेला. यातील बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. येथे एकच अमरधाम अमरधाम आहे. गुरुवारी रात्री दीड वाजेपर्यंत अमरधाममध्ये ४२ तर दफनभूमीमध्ये ३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाममध्ये दोन विद्युत दाहिन्या आहेत. तेथे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात या दाहिन्यांमध्ये २० अंत्यसंस्कार झाले. मृतांचा आकडा मोठा असल्याने रात्री २२ अंत्यसंस्कार सामूहिकपणे ओट्यावर करण्यात आले. त्यासाठी अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अंत्यविधीवेळी नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत. गुरुवारी रात्री मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची अक्षरश: रांग लागली होती. शुक्रवारीही सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता. रात्री हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

....

एका शववाहिकेतून ५ ते ६ मृतदेहांची वाहतूक

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात.

......

मनपाची नवीन शववाहिका अडकली लालफितीत

कोरोनाच्या पहिल्या लाटेत गत एप्रिल महिन्यात एका दिवसात कोरोनामुळे ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी एकाच शववाहिकेतून पाच ते सहा मृतदेहांची वाहतूक होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे नगर मनपाने अन्य एक शववाहिनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला; परंतु वर्ष उलटूनही नवीन शववाहिका खरेदी केलेली नाही. आता तातडीने दोन शववाहिका भाडेतत्त्वावर घेण्याचा आदेश दिला असल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

..........

तीन मंत्री असताना मृतदेहांवर हा प्रसंग -विखे

जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकाच दिवशी ४५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. यातील एकाही मंत्र्याने कोरोनाच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

Web Title: 45 funerals in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.