बारा वर्षात ४५ वाहने भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:37+5:302021-03-04T04:36:37+5:30
अहमदनगर : चारचाकी वाहनांचे आयुष्य किमान पंधरा वर्षे असते. महापालिकेच्या घंटागाड्या व ट्रॅक्टर मात्र बारा वर्षांतच थप्पीला लागले असून, ...
अहमदनगर : चारचाकी वाहनांचे आयुष्य किमान पंधरा वर्षे असते. महापालिकेच्या घंटागाड्या व ट्रॅक्टर मात्र बारा वर्षांतच थप्पीला लागले असून, ही वाहने भंगारात काढण्याची वेळ महापालिकेवर ओढावणार आहे. त्यामुळे बारा वर्षांत दोनवेळा केलेल्या वाहन खरेदीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
शासनाने १५ वर्षांपूर्वीची सरकारी व खाजगी चारचाकी वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा निर्णय १५ वर्षांचा असला तरी अहमदनगर महापालिकेची वाहने १२ वर्षांत भंगारात निघाली आहेत. ही नादुरूस्त वाहने मोटर विभागात एका रांगेत उभी केली गेली आहेत. महापालिकेने सन २००८ मध्ये शहरातील कचरा संकलनासाठी ३० वाहने खरेदी केली. ही वाहने कमी पडू लागल्याने याच काळात नवीन १२ ट्रॅक्टर खरेदी केले गेले. या वाहनांव्दारे शहरातील कचरा संकलनाचे काम सुरू होते. त्यानंतर नोंव्हेबर २०१९ मध्ये कचरा वाहतुकीचे खासगीकरण केले गेले. कचरा संकलनाचे काम खासगी ठेकेदारामार्फत सुरू झाल्याने घनकचरा विभागाकडील ३० घंटागाड्या मोटार विभागात आणून उभ्या केल्या गेल्या. तेव्हापासून ही वाहने जागेवरच उभी आहेत. सुरुवातीला ठेकेदाराने स्वत:च्या वाहनांव्दारे कचरा संकलन केले. हे काम देताना मनपा व पुणे येथील स्वयंभू संस्थेत करार झाला. या करारात मनपाची वाहने भाडेतत्वावर घेण्याची अट होती. महापालिकेने ठेकेदाराला जुनी वाहने भाडेतत्वावर न देता नवीन ६४ वाहने खरेदी केली. नव्याने खरेदी केलेली वाहने ठेकेदाराला भाडेतत्वावर देण्यात आली असून, बारा वर्षांत कचरा संकलनासाठी दोनवेळा वाहनांची खरेदी मनपाकडून केली गेली. कचरा संकलन करण्यासाठी केंद्र शासनाकडून मोठा निधी मिळतो. या निधीतून ही वाहने खरेदी केली गेली. शासनाकडून मिळतात ना मग करा खरेदी, असे म्हणत पदाधिकाऱ्यांनी वाहने खरेदीला मंजुरी दिली. पण, जुन्या वाहनांचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहेत. जुन्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय मनपाने घेतला. तसे पत्र उप प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले. परंतु, या विभागाने अद्याप वाहनांचा लिलाव करण्यास परवानगी दिली नाही. त्यात आता शासनाने १५ वर्षांपूर्वीची वाहने वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनपाची ही बारा वर्षांची जुनी वाहने कोण खरेदी करणार, असाही प्रश्न आहे. लिलावात जरी वाहने खरेदी केली तरी ही वाहने दोन वर्षंच वापरात येणार आहे. त्यामुळे लिलावालाही प्रतिसाद मिळेल का याबाबत साशंकता आहे.
....
मनपाकडील वाहने
आरोग्य-७६,मोटर व्हेईकल- ०५, अग्निशमन- ०७, पाणीपुरवठा-०३, विद्युत-०३, बांधकाम-०४,
.....
ठेकेदाराला भाडेतत्वावर दिलेली वाहने
६२
.....
बंद असलेली वाहने
४०७-१५, टाटा एसीई- १५, टाटा ११०९- २, ट्रॅक्टर-१३, ट्रेलर-१४, ७०९- ०३,
...