४८ कठ्यांची नवसपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2016 11:17 PM2016-05-16T23:17:51+5:302016-05-16T23:25:19+5:30
राजूर : हजारो भाविकांच्या साक्षीने कुलदैवत बिरोबाच्या जयघोषात अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे ४८ नवसाचे पेटते कठे डोक्यावर मिरवत भक्तांनी नवसपूर्ती फेडली.
राजूर : हजारो भाविकांच्या साक्षीने कुलदैवत बिरोबाच्या जयघोषात अकोले तालुक्यातील कौठवाडी येथे ४८ नवसाचे पेटते कठे डोक्यावर मिरवत भक्तांनी नवसपूर्ती फेडली.
मोठा माठ तळाच्या बाजूने कापत तो जमिनीवर उपडा ठेवला जातो. यात सौंदड, सादडा यांसारख्या कडक असणाऱ्या लाकडाच्या ढलप्या विशिष्ट आकाराने रचतात. त्याच्यावर पांढरेशुभ्र कापड गुंडाळलेले असते. या माठाला रंग देत फुलांच्या माळांनी सजविलेला असतो. या पद्धतीने नवसाचा कठा तयार केला जातो. यात गोडेतेल ओतले जाते. हे तेलही नवसपूर्तीनुसारच त्यात ओतले जाते. अशा प्रकारे तयार केलेले हे कठे देवाची काठी मंदिराच्या गाभाऱ्यात स्पर्श केल्यानंतर पेटविले जातात. हे कठे ज्वाला ओकू लागले की, मंदिराच्या बाहेरील मोकळ्या जागेत चित्कार करणारे भक्तगण डोक्यावर घेत मंदिराभोवती एकपासून तर मध्यरात्रीच्या बारापर्यंत काही भक्त फेरे मारत असतात.
आदिवासी पट्ट्यातील कठ्याची यात्रा बघण्यासाठी मुंबई, नाशिक, पुणे या जिल्ह्यांतूनही भाविक येत असतात. श्रद्धेपोटी बिरोबाला बोलले जाणारे नवस फेडण्यासाठी भाविक हे कठे ठेवत असतात. यातील परंपरेनुसार पहिला कठा उचलण्याचा मान हा भोईरांचा असतो. भोईरांनी कठा उचलला की अन्य भक्त हे कठे डोक्यावर घेतात.
यावर्षी नवसपूर्तीसाठी ४८ कठे मांडण्यात आले होते. पेटते कठे मंदिराभोवती फिरवत असताना या कठ्यांच्या ज्वालांनी सभोवतालचा परिसर उजाळून निघत होता तर आसमंत बिरोबाच्या जयघोषांनी दुमदुमून गेला होता. हा अनोखा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी रविवारी रात्री उच्चांकी गर्दी झाली होती.
यात्रा कमिटीचे योग्य नियोजन व राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी दक्षता घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही. रविवारी मध्यरात्री बाराला पाच मिनिटे बाकी असताना अखेरचे कठे भक्तांच्या डोक्यावरून उतरविण्यात आले. सुमारे दीड तासाहून अधिक वेळ हा कार्यक्रम रंगला होता. (वार्ताहर)