जिल्ह्यात ४८ तूर खरेदी केंद्रे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:32+5:302020-12-31T04:21:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ११, तर फारमर प्रोड्युसर कंपनीने ३७, अशी ४८ तूर खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्यात आली असून, नावनोंदणीनंतर प्रत्यक्षात तूर खरेदीला सुरुवात होणार आहे.
केंद्र शासनाने शेतीमालासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजना सुरू केली आहे. तुरीला प्रतिक्लिंटल सहा हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८२९ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी करण्यात आली होती. यंदा पुरेसा पाऊस पडल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. नाफेडच्या वतीने येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने तूर खरेदी केंद्रासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यास अकरा तालुक्यांतून प्रतिसाद मिळाला. फेडरेशनने ११ तूर खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून, नावनोंदणीही सुरू करण्यात आली आहे. पुणे येथील फार्मर प्रोड्युसर कंपनीने नगर जिल्ह्यातील ३७ तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४८ खरेदी केंद्रांत शासकीय दराने तुरीची खरेदी केली जाईल. त्यापूर्वी नोंदणी केली जाणार आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्याच्या मोबाइलवर मेसेज पाठविला जाणार आहे. हा मेसेज प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी केंद्रावर घेऊन यायचे आहे. खरेदी केंद्रावर प्रतवारी करण्यात येते. त्यानंतर ती गोदामात पाठविली जाते. ही तूर साठविण्यास योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी होते. साठविण्यास योग्य नसल्यास तूर शेतकऱ्यांना परत केली जाते. तूर गोदामाची पावती मार्केटिंग फेडरेशनकडे जमा होते. या कार्यालयाकडून पावती व बँक खात्याबाबतची माहिती नाफेडला पाठविण्यात येते. बँक खात्याची खात्री करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
..
...अशी करा नोंदणी
केंद्र शासनाच्या एनईएमएल या पोर्टलवर शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी शासनाच्या पोर्टलवर नावनोंदणी करावी, असे आवाहन व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
...
ही कागदपत्रे आहेत आवश्यक
- तलाठी पीक पेरा नोंदणी असलेले ८ अ व सातबारा आवश्यक.
- आधार कार्डाची छायांकित प्रत.
- बँक खाते पासबुक छायांकित प्रत.
- ज्या तालुक्यात जमिनी आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.
.....
...अशी आहेत तूर खरेदी केंद्रे
मार्केटिंग फेडरशेन
राहुरी, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, खर्डा, ता. जामखेड, पाथर्डी, शेवगाव, नगर, साकत, ता. नगर, मांडवण, ता. श्रीगोंदा.
...
फार्मर प्रोड्युसर कंपनी
राहुरी-२, श्रीगोंदा-३, कर्जत-६, जामखेड-२, पाथर्डी-२, शेवगाव-४, नगर-२, कोपरगाव-२, नेवासा-४, पारनेर-१.