नगर जिल्ह्यातील ४९४ गावनेते होऊ शकतात निवडणूक लढविण्यास अपात्र; जिल्हाधिका-यांनी बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 04:49 PM2017-12-11T16:49:15+5:302017-12-11T16:52:57+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते.
अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते. नोटिसा बजावलेल्यांमध्ये बहुतांशी उमेदवार हे पराभूत आहेत.
नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणा-या जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत सरपंचपदासाठी एकूण ४ हजार ८४८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभरात निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर करणे उमेदवारांना बंधनकारक होते. त्यानुसार ८ नोव्हेंबरपर्यंत ४ हजार ३५४ उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालयात खर्च सादर केला. परंतु ही मुदत उलटली तरी ४९४ उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याचे आढळले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या सर्व उमेदवारांना लेखी नोटिसा बजावून वेळेत खर्च सादर का केला नाही, अशी विचारणा केली आहे. याबाबत आपले म्हणणे सादर करावे, अन्यथा आगामी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले जाईल, असा इशारा उमेदवारांना देण्यात आला आहे. या उमेदवारांसाठी २७ ते २९ डिसेंबरदरम्यान सुनावणी ठेवली असून, त्यात या उमेदवारांनी स्वत: किंवा आपल्या वकिलामार्फत आपली बाजू मांडायची आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे पुढील कारवाई होऊ शकते.