नगर जिल्ह्यात गुरुवारी एकाच दिवसात ५ जण कोरोनाबाधित; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:14 PM2020-04-24T14:14:39+5:302020-04-24T14:15:31+5:30
नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे.
अहमदनगर : नेपाळ येथून संगमनेरला आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले तर रात्री जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३८ वर पोहोचली आहे.
संगमनेर येथील एका इमारतीतून या १४ व्यक्तींना ४ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, १४ दिवसांनंतर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली़
या ४ व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची चाचणी करण्यात आली. त्यात, १० व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह तर ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे या व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते.
रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जामखेड येथील एका स्थानिकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. जामखेड येथील दोघा जणांना बुधवारी (दि.२२) कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील एकाच्या वडिलांचा अहवाल गुरुवारी (दि.२३) पॉझिटिव्ह आला़ त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८ वर पोहोचली आहे़ कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २० झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये ११ जण उपचार घेत आहेत. संगमनेर येथे आढळलेल्या या चार रुग्णांना नगरच्या बूथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.