श्रीनाथ मल्टिस्टेट पतसंस्थेकडून ५ कोटींची फसवणूक; राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 08:41 PM2017-12-14T20:41:24+5:302017-12-14T20:42:38+5:30
पुणे येथील श्रीनाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या बहुराज्यीय पतसंस्थेच्या पुणतांबा (ता. राहाता) शाखेने १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राहाता : पुणे येथील श्रीनाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या बहुराज्यीय पतसंस्थेच्या पुणतांबा (ता. राहाता) शाखेने १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाधिकारी व संचालक मंडळाविरुध्द गुरूवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पतसंस्थेच्या पदाधिका-यांनी पुणतांबा परिसरातील ठेवीदारांचा विश्वास संपादन करून या शाखेत १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी २०१४ पासून जमा केल्या होत्या. सर्वसामान्य व्यावसायिक, शेतमजूर व गरीब ठेवीदारांनी पतसंस्थेत आयुष्यातील जमा झालेली पुंजी ठेव म्हणून ठेवली होती. ठेवीदारांनी वारंवार ठेवी परत मिळण्यासाठी मागणी केली, पण पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शाखाधिकारी व संचालक मंडळाने फिर्यादी प्रसाद राधाकृष्ण बोडखे व इतर खातेदारांना ठेवी परत करण्यास सातत्याने नकार दिला.
पतसंस्थेच्या पदाधिका-यांवर विश्वास ठेऊन पुणतांबा परिसरात अनेक सर्वसामान्य व्यावसायिक, शेतमजूर यांनी ठेवी ठेवल्या होत्या. गरज असताना ठेवीदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले नाही. सहकार खात्याने तात्काळ ठेवीदारांचे पैसे परत करण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.
यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल
पुणतांबा येथील प्रसाद बोडखे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष पोपट एकनाथ शेवाळे (रा. हडपसर, पुणे), उपाध्यक्ष शंकर रामभाऊ धुमाळ (रा. वडगाव गुप्ता, अहमदनगर), शाखाधिकारी किशोर लहानू राऊत (रा. पुणतांबा) व इतर संचालक मंडळाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.