शासकीय रूग्णवाहिकेला दररोज ५० लिटर डिझेल मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:56 PM2020-04-09T16:56:27+5:302020-04-09T16:58:01+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रिलायन्स पेट्रोल-डिझेल पंपाचे मालक मंगेश जपे यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून तालुक्यातील शासकीय रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कोपरगाव : कोरोनावर मात करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील रिलायन्स पेट्रोल-डिझेल पंपाचे मालक मंगेश जपे यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून तालुक्यातील शासकीय रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर डिझेल मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७९ गावे आहेत. ग्रामीण भागात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरात नगरपरिषदेचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तसेच तालुक्यासाठी कोपरगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. या अंतर्गत बाहेरून आलेल्या ६ हजार ७८२ नागरिकांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. यात रुग्णांची ने-आन करण्यासाठी सध्या रुग्णवाहिकेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ही बाब महेश जपे यांच्या निदर्शनास आली. या संदर्भात त्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेतली. तहसीलदार चंद्रे यांनी त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. कोपरगावात एकूण पाच रुग्णवाहिका आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तीन, ग्रामीण रुग्णालय एक व १०८ टोल फ्री क्रमांकाची एक अशा या रुग्णवाहिकांना दररोज ५० लिटर मोफत डिझेल देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच विविध क्षेत्रातील लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे आपले देखील काहीतरी सामजिक कर्तव्य आहे. याच भावनेतून हा उपक्रम सुरु केला आहे.- मंगेश जपे, येसगाव, ता.कोपरगाव
संकटाच्या काळात पुढे येऊन रुग्णवाहिकेला दररोज ५० लिटर डिझेल मोफत देणे. ही गौरवाची बाब आहे. - डॉ. संतोष विधाते, तालुका वैद्यकिय अधिकारी, कोपरगाव