५ वाण, ५४ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता
By Admin | Published: May 18, 2014 11:19 PM2014-05-18T23:19:49+5:302024-03-26T14:26:36+5:30
राहुरी : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तीन दिवशीय सयुंक्त कृषी संशोधन बैठक पार पडली.
राहुरी : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तीन दिवशीय सयुंक्त कृषी संशोधन बैठक पार पडली. या बैठकीत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पाच वाण, दोन कृषी यंत्रे व ५४ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता मिळाली आहे़ तीन दिवशीय बैठकीत कुलगुरू डॉ़ तुकाराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संशोधन संचालक डॉ़ राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतपिके वाण प्रसारण, शेतपिके वाण संरक्षण, कृषी विद्यापीठाच्या नवीन वाण व तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या़ गहू, आंबा, सीताफळ, लसूण वाणांचा समावेश शिफारशीमध्ये गव्हाचा फुले समाधान, कारळाचा फुले वैतरणा, आंब्याचा फुले अभिरूची, सिताफळाचा फळे पुरंदर, लसणाचा फु ले निलीमा हे वाण प्रसारित करण्यात आले़ मानवचलीत फुले ज्वारी काढणी यंत्र, मानवचलीत फुले औषधी बिया फोडणी यंत्र प्रसारित करण्यात आले़ प्रसारित वाण : गहु फुले समाधान-सरबती गव्हाचा एऩआय़ए़डब्ल्यु. १९९४ हा वाण महाराष्टतील बागायती क्षेत्रात वेळेवर किंवा उशीरा पेरणीसाठी प्रसारित करण्यात आला आहे़ आंबा फुले अभिरूची आंब्याच्या उत्तम प्रतिच्या लोणच्यासाठी फुले अभिरूची प्रसारित करण्यात आला आहे़ कारळा फुले वैतरणा हा अधिक उत्पादन व तेलाचे अधिक प्रमाण असणारा चमकदार काळया रंगाचा वाण महाराष्टात खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आला आहे़ सीताफळ फुले पुरंदर या निवड वाणाची जास्त उत्पादन क्षमता फळाचा मोठा आकार, बियांचे कमी प्रमाण, गराचे जास्त प्रमाण, पांढरा रंगाच्या अधिक पाकळ्यांची संख्या अशा गुणधर्मांमुळे राज्यात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे़ लसूण फुले निलीमा अधिक उत्पादन मोठ्या आकाराचे आकर्षक जांभळ्या रंगाचे गड्डे तसेच उत्तम साठवण क्षमता व कीड व रोगास मध्यम प्रतिकारक्षम असलेला हा वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे़