सात गावठी पिस्तुलांसह ५० काडतुसे जप्त

By Admin | Published: September 27, 2014 12:10 AM2014-09-27T00:10:26+5:302014-09-27T00:15:45+5:30

अहमदनगर : मध्यप्रदेशमधून गावठी पिस्तूल विकणारी दोन जणांची टोळी तोफखाना पोलिसांनी जेरबंद केली आहे.

50 cartridges seized along with seven village pistols | सात गावठी पिस्तुलांसह ५० काडतुसे जप्त

सात गावठी पिस्तुलांसह ५० काडतुसे जप्त

अहमदनगर : मध्यप्रदेशमधून गावठी पिस्तूल विकणारी दोन जणांची टोळी तोफखाना पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीची सात गावठी पिस्तुले व ५० जीवंत काडतुसे हस्तगत केल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश येथील दोन इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी नगरच्या तारकपूर येथील बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी कारवाई करीत दोन शिकलकऱ्यांना अटक करण्यात आली. महारसिंग इंदरसिंग जुनेजा (वय ४५,धंदा लोहारकाम, रा. उमर्टी, पोस्ट बलवाडी, ता. वरला, जि. बडवानी, मध्यप्रदेश) आणि अनिस सनपत खरते (वय २१,रा.घेगाव, पोस्ट बलवाडी, ता. वरला जि. बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता महारसिंग याच्या कमरेला डाव्या बाजूस २५ हजार ५०० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व पिस्तुलाच्या मॅगेझिनमध्ये एक जीवंत काडतूस आढळून आले. त्यांच्याविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट अन्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यातील आरोपी महारसिंग जुनेजा याने मध्यप्रदेश येथून नगर येथे पिस्तूल विक्रीस आणले होते. ही पिस्तुले तारकपूर बसस्थानकाच्या मागे लवपून ठेवल्याचे त्याने सांगितले. तिथे गावठी बनावटीची सहा पिस्तुले आढळून आली. त्याची किंमत दीड लाख रुपये एवढी आहे.
गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी पिस्तुलांबरोबर काडतुसेही आणली असावीत व ती कोठेतरी लवपून ठेवल्याची शंका पोलिसांना होती. त्यानुसार महारसिंग याला हिसका दाखविताच त्याने राधाबाई काळे अतिथीगृहाच्या भिंतीलगत झुडपांमध्ये काडतुसे जमिनीत खड्डे करून पुरून ठेवल्याचे सांगितले. तिथे तब्बल ५० जीवंत काडतुसे आढळून आली असून त्याची किंमत २५ हजार रुपये एवढी आहे. पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, संजय इस्सर, शैलेश जावळे, भरत डंगोरे, अभय कदम, राम माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
(प्रतिनिधी)
१५ दिवसांत मोठी कारवाई
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. त्यानुसार आतापर्यंत सहा पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या कारवाईत १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये १२ गावठी पिस्तूल, ६० काडतुसे पकडण्यात आली आहेत. मध्यप्रदेशात गावठी पिस्तूल तयार करून विकणारा जुनेजा ताब्यात आल्यामुळे विक्रीस आळा बसणार आहे. एक महिन्यात एक पिस्तूल तयार करून विकत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. पिस्तूल विक्रीमागे आणखी काही साखळी आहे का, हे चौकशीत निष्पन्न होईल, असे बलकवडे यांनी सांगितले.

Web Title: 50 cartridges seized along with seven village pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.