बसेसच्या ५० फेऱ्या, उत्पन्न केवळ सव्वा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:38+5:302021-04-13T04:19:38+5:30

श्रीरामपूर : लॉकडाऊनमुळे एस. टी. महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या २५ बसेसच्या नगर, पुणे, कोल्हापूर ...

50 rounds of buses, income only Rs | बसेसच्या ५० फेऱ्या, उत्पन्न केवळ सव्वा लाख

बसेसच्या ५० फेऱ्या, उत्पन्न केवळ सव्वा लाख

श्रीरामपूर : लॉकडाऊनमुळे एस. टी. महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या २५ बसेसच्या नगर, पुणे, कोल्हापूर व अकलूज येथे फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तब्बल पाच हजार किलोमीटर प्रवास करूनही निम्मेच उत्पन्न हाती पडत आहे.

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन सुरू केला आहे. मात्र, एस. टी. महामंडळाला त्यातून सूट देण्यात आली आहे. श्रीरामपूर आगाराच्या राज्याबाहेरील सूरत, इंदोर तसेच मुंबई येथील बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत बसेसही उत्पन्नाअभावी बंद आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ नगर, पुणे, कोल्हापूर व अकलूज येथील फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

आगारातून या शहरांसाठी सध्या दररोज २० ते २५ बसेस सुरू आहेत. मात्र, त्यांना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. क्षमतेच्या केवळ ५० टक्के प्रवासी बसेसना मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना केवळ एक ते सव्वा लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. कोरोना पूर्वकाळामध्ये या बसेस दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न एस. टी. च्या तिजोरीत जमा करत होत्या.

----------

आगारातील एकूण बसेस : ४८

दोन दिवसांत धावलेल्या बसेस : २५

एकूण झालेल्या फेऱ्या : ४५

मिळालेले उत्पन्न : सव्वा लाख रुपये

----------

मालवाहतूक मात्र जोरात

श्रीरामपूर आगाराने ४८ पैकी १२ बसेस या माल वाहतुकीसाठी सुरू केल्या आहेत. सोयाबीन, गहू तसेच कांद्याची ते राज्यात वाहतूक करतात. व्यापाऱ्यांची या बसेसना चांगली मागणी आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात येथील आगाराने मालवाहतुकीमधील उत्पन्नात पारनेरनंतर दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

--------------

पूर्ण कर्मचारी कामावर

येथील आगारामध्ये एकूण ३२५ कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. आगारात फार गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

----------

कोरोना व लॉकडाऊन काळात आमच्या कर्मचाऱ्यांनी चोखपणे सेवा बजावली आहे. मुंबईतील बेस्ट बसेसवर काम करण्यासाठी त्यांना प्रसंगी जावे लागते तरीही ती कार्यतत्पर आहेत.

राकेश शिवदे, आगारप्रमुख, श्रीरामपूर.

---------

Web Title: 50 rounds of buses, income only Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.