नारळाच्या भुशाखाली लपवला ५०० किलो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:44+5:302021-08-28T04:25:44+5:30

७५ लाख रुपये किंमत असलेला हा गांजा उस्मानाबाद जिल्ह्यातून नाशिककडे नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ...

500 kg of cannabis hidden under coconut husk | नारळाच्या भुशाखाली लपवला ५०० किलो गांजा

नारळाच्या भुशाखाली लपवला ५०० किलो गांजा

७५ लाख रुपये किंमत असलेला हा गांजा उस्मानाबाद जिल्ह्यातून नाशिककडे नेला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस नाईक दीपक रोकडे, चालक कैलास भिंगारदिवे हे तिघे लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी ते संगमनेर रस्त्यावर पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान गस्त घालत होते. यावेळी चंद्रापूर (ता. राहाता) फाटा या ठिकाणच्या बस स्थानकानजीक एक महिंद्रा पिकअप् (एमएच २५, पी १२९४) ही संशयित स्थितीत जात असताना दिसली. यावेळी त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला, मात्र चालक थांबला नाही. पाटील व त्याच्या सहकाऱ्यांनी पिकअप्चा पाठलाग करून ती थांबविली व राहुल बाबासाहेब पवार (वय २३, रा. खर्डा, ता. जामखेड ) व दत्ता मारुती चव्हाण (३५, रा. खर्डा, ता. जामखेड) या दोघांकडे विचारपूस केली असता, दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे आल्याने पोलिसांना त्यांचा संशय आला. त्यांना ताब्यात घेत पिकअप्ची झडती घेतली असता, त्यामध्ये ५०० किलो गांजा हा पांढऱ्या रंगाच्या गोण्यांत आढळल्या. या गोण्या नारळाच्या भुशाने भरलेल्या गोण्यांच्या खाली लपवलेल्या आढळून आल्या. या गांजाची किंमत ७५ लाख रुपये इतकी आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले.

Web Title: 500 kg of cannabis hidden under coconut husk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.