इयत्ता चौथीची पुढील महिन्यात होणाऱ्या 'पॅट' परीक्षेच्या ५०० प्रश्नपत्रिका श्रीगोंद्यात आल्या रस्त्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:49 IST2025-03-29T15:43:27+5:302025-03-29T15:49:58+5:30
यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली

इयत्ता चौथीची पुढील महिन्यात होणाऱ्या 'पॅट' परीक्षेच्या ५०० प्रश्नपत्रिका श्रीगोंद्यात आल्या रस्त्यावर!
लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर): इयत्ता चौथीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या पॅट परीक्षेच्या शासनाकडून मिळालेल्या प्रश्नपत्रिका वाहनातून बीडकडे नेताना श्रीगोंद्यात रस्त्यावर पडलेल्या सापडल्या. गणित विषयाच्या सुमारे ५०८ प्रश्नपत्रिका गोळा करून पोलिसांकडे जमा करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी समोर आलेल्या या प्रकाराने प्रश्नपत्रिका हाताळणाऱ्यांचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. यासंदर्भात विजय उंडे यांनी श्रीगोंदा पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी सकाळी जामखेड - न्हावरा राष्ट्रीय महामार्गावर गणित विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका विखुरलेल्या आढळल्या.
प्रश्नपत्रिका पॅटच्या
राज्यात शिक्षण विभागाने स्टार्स प्रकल्पांतर्गत तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षेसोबतच नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतून सर्व शाळांना प्रश्नपत्रिकांचा पुरवठा होत केला जातो.
श्रीगोंदा शहरात सापडलेल्या या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. याचा अहिल्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाशी काही संबंध नाही.
-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी