मिरीच्या कोविड सेंटरला ५० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:08+5:302021-05-31T04:17:08+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील श्री दत्तकृपा कोविड सेंटरला ख्रिश्चन व मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने ५० हजार ...
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील श्री दत्तकृपा कोविड सेंटरला ख्रिश्चन व मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली, अशी माहिती पंचायत समिती सदस्य राहुल गवळी व सरपंच आदिनाथ सोलाट यांनी दिली.
गेल्या दीड महिन्यापासून नि:स्वार्थ भावनेतून येथे कोविड सेंटर सुरू आहे. सेंटरच्या माध्यमातून परिसरातील दहा-पंधरा गावांमध्ये बाधित झालेल्या कोरोना रुग्णांना याठिकाणी सर्वोत्तम सेवा देऊन त्यांना जीवनदान देण्याचे काम येथे सुरू आहे. मिरी येथील ख्रिश्चन बांधवांनी एकत्रित येत नाशिक धर्मप्रांताचे बिशप रेव्ह. शरद गायकवाड व त्यांच्या पत्नी रेव्ह. मेघा गायकवाड, प्रशांत पगारे, कुमार लोंढे, केनिथ कालसेकर, सरोज साळवे, राहुल पाटोळे, दिनेश सोनावणे, जनार्दन मीरपगार, सुनील औताडे यांच्या उपस्थितीत पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. येथील मुस्लीम बांधवांच्यावतीने जाकीर पटेल, राजू इनामदार, इमरान शेख, मेहबूब शेख, अज्जू इनामदार, राजू शेख यांच्या हस्ते पंचवीस हजार रुपये देण्यात आले.