विसापूर कारागृहाचे ५३ कैदी रजा मिळूनही कारागृहातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:28 AM2020-05-15T11:28:45+5:302020-05-15T11:30:21+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
नानासाहेब जठार ।
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
विसापूर कारागृहाची क्षमता २०० कैद्यांची असून कारागृहात सध्या ९७ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी वेगवेगळ्या कारागृहात शिक्षा भोगणाºया कैद्यांना ४५ दिवसाच्या अभिवचन रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. या सर्व रजेवर जाणाºया कैद्यांना त्यांच्या मूळगावी व शहरात घरी जाण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी कारागृह प्रशासनाकडून ओळखपत्रे देण्यात आली.
कैदी कारागृहातून रवाना करताना त्यांची आरोग्य तपासणी कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत वाघ यांनी केली. कारागृह प्रशासनाच्या माहितीनुसार सर्व कैदी आपआपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. आणखी सात कैदी अभिवचन रजेवर पाठवण्यास पात्र आहेत. मात्र त्यापैकी काही कैदी कोरोनाचा धोका नको म्हणून सुट्टीवर जाण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यांच्या गावी गेलेले कैदी त्या त्या भागात क्वारंटाईन झाले आहेत, अशी माहिती विसापूर कारागृहाचे तुरूंगाधिकारी बाळकृष्ण जासूद यांनी दिली.
विसापूर कारागृहातील ५३ कैद्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार ४५ दिवसांच्या रजेवर पाठवण्यात आले. ४५ दिवसानंतर स्वत: कारागृहात हजर होण्याचे त्यांच्याकडून अभिवचन घेण्यात आले आहे. रजा संपल्यानंतर ते कारागृहात हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विसापूर खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक प्रकाशसिंग परदेशी यांनी सांगितले.
माझी शिक्षा आणखी अडीच वर्षे बाकी आहे. मला कारागृहाकडून ४५ दिवसांची रजा मिळत आहे. मात्र माझी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला जाण्याची व धोका पत्करण्याची इच्छा नाही. कोलकात्याला जाण्याची व्यवस्था झाली तर जाईन. अन्यथा मी कारागृहातच सुरक्षित आहे, असे कारागृहातील परप्रांतीय कैदी मनीष ठाकूर याने सांगितले.
मी ठाणे येथील रहिवासी आहे. माझी शिक्षा आणखी दोन वर्षे बाकी आहे. तरीही मी ४५ दिवसांच्या अभिवचन रजेवर जाणार नाही. कोरोनाचा धोका माझ्यासाठी व कुटुंबातील लोकांसाठी निर्माण करू इच्छित नाही. त्यामुळे कारागृहातच राहणार आहे, असे विसापूर कारागृहातील कैदी प्रशांत पवार याने सांगितले.