Ahmednagar: ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे सांगत ५८ हजार लांबविले
By शेखर पानसरे | Published: October 11, 2023 01:22 PM2023-10-11T13:22:14+5:302023-10-11T13:22:52+5:30
Ahmednagar: काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणत अज्ञात तरुणाने ५३ वर्षीय शेतकऱ्याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून ५८ हजार रुपये लांबविले.
- शेखर पानसरे
संगमनेर : ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणत अज्ञात तरुणाने ५३ वर्षीय शेतकऱ्याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून ५८ हजार रुपये लांबविले. ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत घडली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तू लहानभाऊ गुंजाळ (वय ५३, व्यवसाय : शेती, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. आयडीबीआय बँकेची संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथे शाखा आहे. तेथे गुंजाळ हे रुपये भरण्यासाठी गेले होते. ते लाईनमध्ये उभे असताना त्यांच्याजवळ आलेला अज्ञात तरुण त्यांना ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणाला. त्याने गुंजाळ यांना बाजूला घेतले, त्यांच्या हातातील पैशांचे बंडल घेऊन स्लिपवर नोटांचे नंबर टाकत असताना पैशांचे बंडल खालीवर केले. गुंजाळ यांची नजर चुकवून त्याने ५०० रूपये किमतीच्या ११६ नोटा असे एकूण ५८ हजार रुपये लांबविले. असे फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत.