कार खरेदी करणा-या ६० जणांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:16 PM2019-06-04T16:16:37+5:302019-06-04T16:20:53+5:30
महागडी कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून परराज्यातील ठगांनी गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील ६० जणांची आॅनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे़
अहमदनगर : महागडी कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून परराज्यातील ठगांनी गेल्या चार महिन्यात जिल्ह्यातील ६० जणांची आॅनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ फसवणूक झालेल्यांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहेत़
ओएलएक्स या वेबसाईटचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली आहे़
आॅनलाईन साईटच्या माध्यमातून जुन्या वस्तुंची विक्री व खरेदी करण्याचा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे़ यासाठी ओएलएक्स ही वेबसाईट प्रसिद्ध आहे़ सायबर गुन्हेगारांनी अशा साईटच्या माध्यमातून पैसे लुबाडण्याचा प्रकार सुरू केला आहे़ गुन्हेगार या साईटवर कार विक्रीच्या जाहिराती टाकतात़
महागडी आणि चांगल्या स्थितीतील जुन्या कारचा फोटो अपलोड करून किंमतही टाकली जाते़ किंमत मुद्दामहून कमी टाकली जाते़ तसेच संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिला जातो़ कमी किंमत पाहून जिल्ह्यातील ६० जणांनी कार तर काहींनी मोटारसायकल खरेदीची प्रक्रिया केली़
कारच्या मालकाला संपर्क
केल्यानंतर तो कारचे सर्व कागदपत्र व्हॉटसअॅपवर पाठवून देतो़ प्रथमदर्शनी हे कागदपत्र खरे असल्याचे भासते़ खरेदी आधी दहा ते
वीस टक्के रक्कम आॅनलाईन भरण्यास सांगितली जाते़ त्यानंतर तुमची कार पाठवून दिली आहे, असे सांगून आणखी पैसे पाठविण्याचे सांगितले जाते़ काहीतरी कारणे सांगून ४० ते ५० हजार रुपये खरेदीदारांकडून घेतले जातात़ त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक स्वीचआॅफ होतो किंवा प्रतिसाद दिला जात नाही़ अशाच पद्धतीने जिल्ह्यातील ६० जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे़
आॅनलाईनच्या माध्यमातून जुनी अथवा नवीन वस्तू खरेदी करताना आधी समोरील विक्रेत्यांची विश्वासार्हता तपासावी़ कॅश आॅन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. वस्तू मिळाल्यानंतरच पैसे द्यावेत. चांगली वस्तू कमी अगदी कमी किमतीत मिळत असेल तर त्यात धोका आहे हे लक्षात घ्यावे़ फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी़ -प्रतीक कोळी,
पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
वस्तू विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्या उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, दिल्ली या परिसरात कार्यरत आहेत़ त्यांनी जाहिरात केलेल्या कारवर प्रत्येक राज्यांचे बनावट पासिंग क्रमांक दिले जातात़ महाराष्ट्रातील पासिंग दिसली तर खरेदीदार लगेच संपर्क करतात आणि आॅनलाईन चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात़