६० वर्ष आपण गंगाच साफ करतोय - पद्मश्री डॉ. शरद काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:50 PM2018-02-26T16:50:04+5:302018-02-26T16:55:56+5:30
कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.
अहमदनगर : या देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते. कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.
येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शरद काळे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य ए. के. पंधरकर, डॉ. एस. बी. गायकवाड, प्रा. गिरिष कोकरेजा, प्रा. महेश आहेर आदी उपस्थित होते.
डॉ. काळे म्हणाले, ४० टक्के अन्नाचा कचरा आपल्या देशात आहे. घरातील कच-याचे जर सेंद्रीय खत तयार केले तर देश अतिशय विकसित होवू शकतो. भारताचे कचरा उचलून फेकण्यावर रोज तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. देशभर फिरुन जेवढे विज्ञान शिकलो नाही, तेवढे विज्ञान आईने शिकविले. कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा शेती, शिक्षक व संशोधन हे कार्य अतिशय क्रियाशिल आहे. पण सध्याच्या युगातील युवा पिढीमध्ये हे कार्य करण्याची आवड नाही. यामुळे पुढील पिढीच्या आयुष्याची चिंता वाटते.
प्रारंभी डॉ. चंद्रशेखर व्यंकटेशरमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
आम्ही चुकीच्या धर्मात सापडलो
सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव. स्त्री-पुरुष ही जात आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले तर समाजातील सर्व वाद दूर होतील. सर्वाधिक सहिष्णुतेच्या देशात अडाणीपणामुळे अंदाधुंदपणा वाढला आहे. म्हणूनच आम्ही चुकीच्या धर्म संकल्पनांमध्ये अडकलो आहोत, असेही डॉ. काळे म्हणाले. आम्ही अल्कोहोल हे वाईट आहे, हे लोकांना सांगू शकत नाही आणि कसले आपण विज्ञान दिन साजरा करीत आहोत, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ़ काळे यांनी उद्विग्नता व्यक्त केली.