जिल्ह्यातील शेतक-यांना 684 कोटीचा निधी मंजूर : राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:48 AM2019-01-27T10:48:37+5:302019-01-27T10:49:54+5:30
दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतक-यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास ६८४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी जाहीर झाला
अहमदनगर : दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. दुष्काळामुळे बाधित शेतक-यांना वाटप करण्यासाठी जिल्ह्यास ६८४ कोटी २६ लाख रुपयांचा निधी जाहीर झाला असून त्यापैकी १४० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्य शासन खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम काल पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी प्राजित नायर, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील 1 हजार 421 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करुन तेथे दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन 305 गावे आणि 1 हजार 547 वाड्या-वस्त्यांना 371 टँकर्समार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाई निधीतून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी 8 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुधन जगवण्यासाठी जिल्ह्याबाहेर चारा विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. चारा उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना, गाळपेर योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेतून मका, ज्वारी, बहुवार्षिक चारा पिकांचे बियाणे शेतक-याना 100 टक्के अनुदानावर वितरित केले जात आहे. नावीन्यपूर्ण योजनेतून मूरघास निर्मितीचा आपण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची 1 हजार 639 कामे सुरु असून त्यावर 9 हजार 294 मजूर काम करीत आहे. दुष्काळाची तीव्रता बघून जिल्हा प्रशासनाने 31 हजार 756 कामांचे शेल्फ तयार केले असून त्याची मजूर क्षमता 93 लाख 33 हजार एवढी आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार 136 शेतक-याना 975 कोटी 84 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. राज्यात 50 लाख 70 हजार खातेदारांना 24 हजार 241 कोटी रकमेचा लाभ मंजूर करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. कापसावरील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या 1 लाख 97 हजार 342 शेतक-यांना 157 कोटी 23 लाख रुपयांची मदत दिली जाणार असून, प्राप्त 121 कोटी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी 28 जानेवारीपासून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान राबविणार असल्याचेही ते म्हणाले.
विविध पुरस्कारांचे वितरण
आदित्य धोपावकर (ज्युदो), प्रणिता सोमण (सायकलिंग), सय्यद अस्मिरोद्दिन (पॅरा पावरलिफ्टिंग व एथलेटिक्स), शुभांगी रोकडे ( धनुर्विद्या क्रीडा मार्गदर्शक), शैलेश गवळी (क्रीडा कार्यकर्ता-संघटक) यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विशेष तपास, गुन्हे उघड करणा-या पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, सुदर्शन मुंढे, संदीप मिटके, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अभय परमार, सुनील पाटील, श्रीहरी बहिरट, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनाही गौरवण्यात आले. कायाकल्प अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा पुरस्कार श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंतराव जमदाडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस दलाचे शानदार संचलन, विविध विभागांच्या चित्ररथांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयात द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, संदीप निचित, संदीप आहेर, ज्योती कावरे, राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासकीय इमारत येथे उपविभागीय अधिकारी गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी रोहिणी न-हे, जिल्हा कोषागार अधिकारी महेश घोडके, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधीक्षक कीर्ति जमदाडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर चौधरी, पोलिस निरीक्षक शाम पवरे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिनेश काळे, सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता आनंद नरखेडकर, नायब तहसीलदार शिल्पा पाटील, वैशाली आव्हाड, अर्चना पागिरे, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.