टाकळी ढोकेश्वरमध्ये ७ दुकाने फोडली : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:44 PM2018-07-21T15:44:53+5:302018-07-21T15:45:24+5:30
पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील पस्तीस ते चाळीस गावांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतच शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सात ते आठ दुकान फोडण्यात आली. सराफ दुकानातून दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने, पायातील जोडवे, पैंजण जोड असा ऐवज घेऊन चोरटे चार चाकी वाहनातून पसार झाले.
चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून तोंडाला रूमाल बांधलेले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे. मागील आठवड्यातच सहा दुकाने फोडण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच चोरट्यांनी शुक्रवारी रात्री पुन्हा दुकाने फोडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या निष्क्रियेबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. चोरांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. टाकळी ढोकेश्वर येथे शुक्रवारी रात्री चोरट्यांनी भर बाजारपेठेत धुमाकूळ घातला. पोपट वाळुंज यांचे सार्थक हार्डवेअर, संजय उदावंत यांचे तेजश्री ज्वेलर्स, राजेंद्र उदावंत यांचे बालाजी ज्वेलर्स, मातोश्री फोटो, मातोश्री फुटवेअर तसेच ढोकेश्वर महाविद्यालयामधून एलसीडी टीव्ही चोरून नेला. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान मळगंगानगर, जवाहर नवोदय रस्त्या जवळ हे चोरटे मोटारसायकल चोरून नेताना काही ग्रामस्थांनी पाठलाग केला. मात्र चोरटे पसार झाले होते. दरम्यान पोलीस गस्त सुरू असतानाच टाकळी ढोकेश्वर बायपासला ट्रक व मोटारसायकलचा अपघात झाला होता. या अपघातस्थळी पोलीस असतानाच रात्री दोनच्या सुमारास भरबाजार पेठेतील सात दुकाने फोडून चोरटे पसार झाले.
या चोऱ्या करताना चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानासमोरील सीसीटीव्हीच्या वायर तोडून सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद केले. त्यानंतरही जे सीसीटीव्ही सुरू होते, त्यात तीन मिनिटात एक दुकान फोडल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे सराईत गुन्हेगार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या चार चाकी वाहनाचा अस्पष्ट दिसत असल्याने चोरांचा शोध घेणे पोलीस यंत्रणेला अवघड आहे.
सायंकाळी ७ वाजताच चोरट्यांची सलामी
शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच चोरट्यांनी मोटारसायकल चोरून पहिली सलामी दिली. मोटारसायकल नेताना ग्रामस्थांनी पाठलाग केला, मात्र हातावर तुरी देत चोरटे पसार झाले. ही सलामी दिल्यानंतर पुन्हा रात्री सात दुकाने फोडली. अपघातास्थळी पोलीस असतानाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे चोर-पोलिसांचा हा खेळ संपणार कधी? असा प्रश्न ग्रामस्थ विचारीतआहेत.