जिल्ह्यात ७०० बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:52 PM2018-06-29T14:52:57+5:302018-06-29T14:53:32+5:30

घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे.

700 child malnourished in the district | जिल्ह्यात ७०० बालके कुपोषित

जिल्ह्यात ७०० बालके कुपोषित

अहमदनगर: घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. मोड फुटलेले गहू व हिरवे मुग वाळवून त्यापासून शिरा, धिरडे यासारखे अमायलेजयुक्त सरकारी खुराक बालकांना सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना आहार देऊन दोन महिन्यांत बालके तंदुरुस्त बनविणार असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केला आहे.
शासनाने कमी वजनाच्या तीव्र कुपोषित बालकांसाठी खास ग्राम बालविकास केंद्र सुरू केले आहेत. तीव्र कुपोषित बालकांना अंगणवाडीत पाचवेळा तर घरी तीनवेळा, असा दिवसभरात आठवेळा पौष्टिक आहार बाल ग्रामविकास केंद्रातून दिला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ७०० तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना दोन महिन्यांत तंदुरुस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४५० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथे केंद्र सुरू करण्यात आले असून, टप्प्या-टप्प्याने अन्य तालुक्यांतही केंद्र सुरू होणार आहेत. केंद्र चालविण्यासाठी स्वतंत्र निधी नाही़ पण, प्रति बालक प्रति दिवस २५ रुपये, याप्रमाणे अनुदान आंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साडेचारशे अंगणवाडी सेविकांच्या कुपोषित बालकांच्या आहारासाठी १० लाख रुपये जमा झाले आहेत. बँक खात्यावर जमा झालेल्या पैशातून अंगणवाडीताई कुपोषित बालकांना दिवसभरात पाचवेळा पौष्टिक आहार देणार आहेत.
शासनाने अंगणवाडीतार्इंना आहाराची संहिता दिली आहे. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अमायलेजयुक्त पिठाचा शिरा, उपमा किंवा धिरडे बनवून दिले जाणार आहेत.
अंगणवाडीतील तीव्र कुपोषित बालकांना पाचवेळा हा पौष्टिक आहार दिला जाईल. त्यानंतर घरी तीनवेळचा आहार कसा द्यावा, याबाबत अंगणवाडीताई बालकांच्या मातांना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत बालकांची सलग सात दिवस नियमित तपासणी होईल. आहाराबरोबर वैद्यकीय उपाचारही कुपोषित बालकांवर केले जाणार आहेत.

असे बनवा अमायलेजयुक्त पीठ
गहू किमान २४ तास पाण्यात भिजवावे
मोड आल्यानंतर गहू उन्हात वाळवा
वाळल्यानंतर गहू दळून घ्यावेत
पिठापासून धिरडे,शिरा, उमपा आदी पदार्थ तयार करावेत़
हिरवे मुग किमान १२ तास पाण्यात भिजवा
मोड आलेले मुग उन्हात वाळवा
वाळलेले मुग दळून घ्यावेत
पिठापासून मुलांच्या आवडीनुसार पदार्थ तयार करावे

अशी आहे आहारसंहिता
सकाळी ८ वा - अमायलेजयुक्त पिठाचा शिरा
सकाळी १० वा - अंगणवाडीतील आहार
दुपारी १२ वा - अंगणवाडीतील आहार
दुपारी ४ वा - एक बटाटा, अंडे, केळी
सायंकाळी ६ वा - अमायजेलयुक्त पिठाचा शिरा
रात्री ८ वा - घरचे जेवण
 

Web Title: 700 child malnourished in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.