७१ हजार हेक्टर पोटखराब क्षेत्र येणार लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:37 AM2021-02-18T04:37:17+5:302021-02-18T04:37:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हयामध्ये पोटखराब वर्ग (अ)मध्ये समाविष्ट असलेले क्षेत्र आता लागवडीखाली येणार आहे. या जमिनीची सातबाऱ्यावर ...

71,000 hectares of sub-poor area will come under cultivation | ७१ हजार हेक्टर पोटखराब क्षेत्र येणार लागवडीखाली

७१ हजार हेक्टर पोटखराब क्षेत्र येणार लागवडीखाली

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्हयामध्ये पोटखराब वर्ग (अ)मध्ये समाविष्ट असलेले क्षेत्र आता लागवडीखाली येणार आहे. या जमिनीची सातबाऱ्यावर लागवडीखालील क्षेत्र अशी नोंद होणार असल्याने शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यातील अडथळे दूर होणार आहेत. जिल्यात असे ७१ हजार हेक्टर क्षेत्र पोटखराब असून त्याची लागवडीखालील क्षेत्र म्हणून नोंद होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विशेष सप्तपदी अभियानाच्या माध्यमातून तहसीलस्तरावर कार्यवाहीबाबत एक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये ७१ हजार हेक्टर क्षेत्र पोटखराब असल्याचे आढळून आले आहे. हे क्षेत्र लागवडीखालील क्षेत्र म्हणून घेण्याबाबत सध्या युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. अधिकार अभिलेखामधील पोटखराब क्षेत्र बऱ्याच शेतकऱ्यांनी सुधारणा करुन लागवडीयोग्य आणलेले आहे. जमिनीमध्ये सुधारणा केलेल्या लागवडीयोग्य क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना विविध लाभ मिळत नव्हते. जमीन धारकाने पोटखराब वर्ग (अ) खाली येणारी जमीन लागवडीखाली आणली तरी त्यावर कोणतीही आकारणी करता येत नव्हती. आता शासनाकडील २९ ऑगस्ट २०१८ च्या अधिसूचनेद्वारे पोटखराब क्षेत्रामध्ये येणारी जमीन ही जमीन मालकास कोणत्याहीवेळी लागवडीखाली आणता येईल.

---------

शेतकऱ्यांना लाभ. सरकारला महसूल

जिल्हयातील बऱ्याच शेतकऱ्यांनी पोटखराब वर्ग (अ) क्षेत्र सुधारणा करुन लागवडीयोग्य केलेले आहेत. त्या क्षेत्राच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विमा, नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा मोबदला मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच पिकाखाली असलेले पोटखराब क्षेत्रातील शेती उत्पादनाच्या नियोजनाचे कामात विचार केला जात नव्हता. यापूर्वी पोटखराब म्हणून नोंद असलेले क्षेत्र लागवडीखाली आणता येत होते. परंतु त्यावर महसूलाची आकारणी करता येत नव्हती. या अभियानाच्या माध्यमातून पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणून त्यावर अतिरिक्त महसुलाची आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारलाही अतिरिक्त जमीन महसूल मिळणार आहे.

--------

असे आहे पोटखराब क्षेत्र

तालुका जमिन क्षेत्र (हेक्टर-आर)

अहमदनगर १०६०१.१७

नेवासा ४५९५.३३

श्रीरामपूर १९७४.३१

राहुरी ७१४५.६४

राहाता १९०७.४५

कोपरगाव ५७०६.८३

संगमनेर १४५३.२

अकोले ८३८४.१८

पाथर्डी २४६८.०५

शेवगाव ४२२५.४६

कर्जत २३१२८

जामखेड ३१४६.११

श्रीगोंदा ३१४.३९

पारनेर २९९.८३

---------------

असा आहे कार्यक्रम

स्थळ पाहणी, पंचनामा, हस्तनकाशा करणे-१० ते १७ फेब्रुवारी (पूर्ण)

जमीन महसूल आकारणीबाबतचा अहवाल देणे-१९ ते २३ फेब्रुवारी

भूमी अभिलेख विभागाकडून अभिप्राय घेणे-२६ फेब्रुवारीपर्यंत

भूमी अभिलेखकडून तहसीलदारांना अभिप्राय देणे- १६ मार्चपर्यंत

तहसीलदारांनी प्रांताधिकाऱ्यांना अहवाल सादर करणे- २२ मार्चपर्यंत

प्रांताधिकाऱ्यांनी आदेश देणे-१ एप्रिलपर्यंत

साताबारा उताऱ्यावर नोंद घेणे-६ मेपर्यंत

------------

भांबोरा गाव संपूर्ण पोटखराबात

जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सर्वाधिक २३ हजार हेक्टर क्षेत्र पोटखराब आहे. त्यामध्ये याच तालुक्यातील भांबोरा हे संपूर्ण गाव पोटखराब ‘अ’ वर्गात समाविष्ट आहे. पोटखराब या शिर्षकामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हते. या अभियानामुळे पोटखराब जमिनीची नोंद आता लागवडीयोग्य जमिन अशी होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

Web Title: 71,000 hectares of sub-poor area will come under cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.