जिल्ह्यातील ७५७ गटसचिवांना मिळणार वैद्यकीय विमा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:20 AM2021-05-07T04:20:56+5:302021-05-07T04:20:56+5:30
कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ५३९ सचिव तर संस्था नियुक्त २१८ अशा एकूण ७५७ गट सचिवांना जिल्हा बँकेमार्फत वैद्यकीय ...
कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ५३९ सचिव तर संस्था नियुक्त २१८ अशा एकूण ७५७ गट सचिवांना जिल्हा बँकेमार्फत वैद्यकीय विमा कवच मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याकडे गेल्या महिन्यात बँकेच्या माध्यमातून काम करणारे गटसचिव जिल्हा बँकेशी निगडित असलेल्या सोसायटी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सभासद बांधवांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी तसेच बँक वसुलीच्या कामासाठी त्यांचा थेट संपर्क जनसामान्यांशी येत असतो, परिणामी कोरोनासारख्या महामारीत त्यांच्या आरोग्याचा विचार करून विमा सुरक्षा कवच मिळावे, अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गटसचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले असून जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जवसुलीचे काम शेतकरी व सभासदांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन गटसचिवांना नेहमी करावे लागते. सध्याची आरोग्यविषयक परिस्थिती विचारात घेता आपला जीव जोखमीत टाकून हे सर्व गटसचिव काम करतात. कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अविभाज्य घटक असतो. संस्थेने कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांच्या आरोग्याकडे जाणीपूर्वक लक्ष देण्याची आज खरी गरज निर्माण झालेली असल्यामुळेच गटसचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच संस्थेमार्फत देणे क्रमप्राप्त होते.