जिल्ह्यात रविवारी ७६५ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:44+5:302021-03-22T04:19:44+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकाच दिवशी रविवारी ७६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ...
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. एकाच दिवशी रविवारी ७६५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ५१८ इतकी झाली आहे. रविवारी दोनजणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. नगर शहरात सर्वाधिक २५० जण कोरोनाबाधित झाल्याने चिंता वाढली आहे.
रविवारी ५५९ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ८९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४४ टक्के इतके झाले आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१६ आणि अँटिजेन चाचणीत ११६ रुग्ण बाधित आढळले.
-----
रविवारी आढळले रुग्ण
अहमदनगर - २५०, अकोले - १०, जामखेड - २८, नगर ग्रामीण - ३१,नेवासा - २५, पारनेर - ३६, पाथर्डी- ३३, राहाता -९४, संगमनेर- ७१, श्रीगोंदा -३४, श्रीरामपूर- ४३, कोपरगाव-५५, राहुरी- ११, शेवगाव- १४, कर्जत- ५, कॅन्टोन्मेंट - २, इतर जिल्हा - २३.
-------------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : ७९,८९४
उपचार सुरू असलेले रुग्ण : ३५१८
मृत्यू : ११८६
एकूण रुग्णसंख्या : ८४५९८
-----------
जनता कर्फ्यूला एक वर्ष पूर्ण
गतवर्षी १२ मार्चला नगर जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कोरोना चाचण्या वेगाने सुरू झाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला जनता कर्फ्यू जाहीर केला होता. कोरोनाचा हा पहिला लॉकडाऊन नगर जिल्ह्यातही कडकडीत पाळण्यात आला होता. एक वर्षानंतरही पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा झडत आहेत.