देशभरातून ९० हजार भाजप कार्यकर्ते महाराष्ट्रात; पंकजा मुंडे म्हणाल्या, "ऑक्सिजन कमी झालाय"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 10:20 PM2024-11-16T22:20:42+5:302024-11-16T22:23:27+5:30
प्रत्येक बुथवर पोहोचता येतील, इतके नेते भाजपने महाराष्ट्रात पाठवले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी चारच दिवसे उरले असताना राजकीय पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी आले आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजपनेही जोरदार ताकद लावली आहे. अशातच भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. प्रत्येक बुथवर पोहोचता येतील, इतके नेते भाजपने महाराष्ट्रात पाठवले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. संबंध देशातून ९० हजार लोक आले आल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.
पंकजा मुंडे पाथर्डीत बोलत होत्या. मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ त्या पाथर्डीत गेल्या होत्या. २० तारखेला तुम्ही कमळाच्या फुलासमोरचं बटण दाबा आणि मोनिकाताईंना विजयी करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. तसेच भाजपने यंदाच्या निवडणुकीत जोरदार तयारी केली असून तब्बल ९० हजार भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्रात आल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
"महायुतीची सत्ता आणण्याकरता आपल्या लेकीने योगदान दिलं आहे. हे आपल्याला सांगायचं नाही का? त्यामुळे एकएक आमदार तिथे हात वर करायला हवा. त्यामुळे आपल्याला आमदार द्यावंच लागतंय. हे सर्व बाहेरचे बघायला आलेत. संबंध देशातून लोक आलेत. संपूर्ण राज्यभर ९० हजार बुथ आहेत. त्या ९० हजार बुथवर ९० हजार लोक आले आहेत. भाजपाचं काम गडबडच आहे, साधं नाही. त्यामुळे ऑक्सिजन कमी झालाय. सगळे बघायला आलेत राज्यात काय चाललंय? सगळे कव्हर करतायत, रेकॉर्ड करत आहेत," असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
“सर्वांनी सांगितलं की पंकजा मुंडेंची सभा हवीय आणि त्यामुळे मी आले. तुम्ही एकदा हेलिकॉप्टर बघायलाच या. मी त्याला म्हटलं खालून खालूनच चालव. पडलं तर जास्त लागणार नाही. मी सिंगल इंजिनच्या हेलिकॉप्टरमध्ये जीव मुठीत धरून आले. आज एवढंसं हेलिकॉप्टर घेऊन मी आले, डबल इंजिनचे हेलिकॉप्टर राजनाथ सिंह यांच्या सभेला गेले. मी म्हणाले, स्कुटरला इंजिन बांधून द्या पण मला सभेला जाऊद्या,” असेही मिश्किल विधान पंकजा मुंडेंनी केले.