कर्जत तालुक्यात शांततेत ९३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:45+5:302021-01-16T04:24:45+5:30
कर्जत : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील मतदान कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. ९३.५० टक्के मतदान ...
कर्जत : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील मतदान कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. ९३.५० टक्के मतदान झाले.
सोमवारी (दि.१८) तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मतमोजणी होणार आहे. नांदगाव येथील महिला उमेदवाराने याेग्य न्याय मिळाला नाही, तर न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींसाठी होणार असलेले मतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब आगळे यांचे उत्कृष्ट नियोजन आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्वतः गस्त घालीत ठेवलेला चोख पोलीस बंदोबस्त या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीतील सर्व नियम पाळत ही निवडणूक सुरुवातीपासून शांततेत पार पडली. तालुक्यातील एकूण ५६ ग्रामपंचायतींपैकी राक्षसवाडी खुर्द व निमगाव गांगर्डा या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.
मतदार सकाळपासूनच रांगेत मतदानासाठी उभे होते, तसेच यावर्षी निवडणुकीत युवा प्रथम मतदान करणारे मतदार वाढल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. हा टक्का कुणाच्या मुळावर येतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मिरजगाव, चापडगाव, चिलवडी, पाटेगाव, दुरगाव, बारडगावसह अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मतदानाची दुपारी थोडी संथ गती होती. दुपारनंतर मतदानाने वेग घेतला.
या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. येत्या सोमवारी १८ तारखेला मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होईल. नांदगाव ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये सलमा नशीर सय्यद या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. मात्र, येथे मतदारांना आपल्या मर्जीप्रमाणे मतदान करू दिले नाही. यामुळे या प्रभागात फेरमतदान घ्यावे, अशी मागणी उमेदवार सलमा सय्यद यांनी तहसीलदार कर्जत यांच्याकडे केली आहे. न्याय मिळाला नाही, तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो : १५ कर्जत
कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे दिव्यांग असलेल्या रखमाबाई रोकडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.