अशोक कारखान्यासाठी विक्रमी ९४ टक्के मतदान
By Admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:41+5:302015-04-20T13:10:43+5:30
रविवारी श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ९४ टक्के विक्रमी मतदान झाले. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच झालेल्या दुरंगी सरळ लढतीत या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कुणाला मिळेल, याचा निकाल २१ एप्रिलला लागणार आहे. किरकोळ अपवाद मतदान शांततेत झाले. शेतकरी मंडळाचे प्रमुख नेते व उमेदवार दीपक पटारे यांचे गाव असलेल्या कारेगावात ते व त्यांचे समर्थक तसेच सत्ताधारी लोकसेवा मंडळाचे नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण केवळ बाचाबाचीवर मिटले.
श्रीरामपूर : रविवारी श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ९४ टक्के विक्रमी मतदान झाले. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच झालेल्या दुरंगी सरळ लढतीत या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कुणाला मिळेल, याचा निकाल २१ एप्रिलला लागणार आहे. किरकोळ अपवाद मतदान शांततेत झाले. शेतकरी मंडळाचे प्रमुख नेते व उमेदवार दीपक पटारे यांचे गाव असलेल्या कारेगावात ते व त्यांचे समर्थक तसेच सत्ताधारी लोकसेवा मंडळाचे नेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण केवळ बाचाबाचीवर मिटले.
पटारे व मुरकुटे समर्थकांसह कारेगावात समोरासमोर आले. एकमेकांविरोधात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दहा फुटांच्या अंतरावर दोन्ही जमाव आल्याने तणाव वाढला होता. पोलीस व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने प्रकरण बाचाबाचीवर मिटले.
संचालकांच्या २१ जागांसाठी ४२ उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी ८ वाजता मतदानास सुरुवात झाली. वडाळा महादेव, टाकळीभान, पढेगाव, बेलापूर, पाचेगाव, उंदीरगाव, खैरीनिमगाव,निपाणी वडगाव येथील केंद्रांवर मतदारांनी मतदान केले. मुरकुटे यांनी टाकळीभानमध्ये तर पटारे यांनी कारेगावात मतदान केले. दुपारी उन्हाचा कडाका वाढता असल्याने सकाळीच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. उन्हाचा कडाका कमी झाल्याने दुपारनंतर पुन्हा गर्दी वाढली. लोकसेवाचे नेते व कारखान्याचे सूत्रधार मुरकुटे, त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, तालुकाध्यक्ष बबन मुठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, त्यांच्या अशोक शेतकरी मंडळाचे नेते दीपक पटारे, जिल्हा परिषद सभापती बाबासाहेब दिघे, सचिन गुजर यांनी दिवसभर मतदान केंद्रांना भेटी दिल्या. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रकाश थविल, तहसीलदार किशोर कदम, तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. (प्रतिनिधी)