९४ वर्षांच्या भंडारदरा धरणाला मिळणार चकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:20 AM2021-03-25T04:20:11+5:302021-03-25T04:20:11+5:30
अकोले : केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या साहाय्याने भंडारदरा जलाशयाचे ९४ व्या वर्षात भाग्य उजळले आहे. ७३.७९ कोटींची तरतूद ...
अकोले : केंद्र सरकार व जागतिक बँकेच्या साहाय्याने भंडारदरा जलाशयाचे ९४ व्या वर्षात भाग्य उजळले आहे. ७३.७९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असल्याने जलाशय चकाचक होणार, यात शंका नाही. पहिल्या टप्प्यात १५ कोटी निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
भंडारदरा-शेंडी येथे प्रवरा नदीवर १९१० ते १९२६ या कालावधीत दगडात धरण बांधण्यात आले आहे. या धरणाची साठवण क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट आहे. ३०० दशलक्ष घनफूट मृत साठा आहे. धरणास ९४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. १९६७ या वर्षी कोयना परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपामुळे १९६९ मध्ये या धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. तद्नंतर १९६९ ते ७३ या कालावधीमध्ये भंडारदरा धरणाचे मजबुतीकरण पूर्ण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मुख्य धरणास आधार देणे, प्रिस्ट्रेस केबल बसविणे, सांडव्यामध्ये नवीन वक्रद्वारे बसविणे, सिमेंट ग्राउंटिंग करणे, याचबरोबर धरणावर वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे बसविणे इ. कामे पूर्ण करण्यात आली आहेत. १९७३ ते आजपावेतो भंडारदरा धरणावर कोणत्याही प्रकारची मोठ्या स्वरूपात विशेष दुरुस्तीची अथवा मजबुतीकरणाची कामे करण्यात आलेली नाहीत. सद्य:स्थितीत केंद्रीय जल आयोगामार्फत जागतिक बँकेच्या साहाय्याने असलेल्या धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा-२ (ड्रीप-२) अंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम प्राधान्याने असलेल्या ३० प्रकल्पांमध्ये भंडारदरा धरणाचा समावेश करण्यात आला आहे. सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने धरण सुरक्षा पुनर्विलोकन समितीची स्थापना केलेली आहे. धरणाच्या स्थैर्यतेच्या दृष्टीने योग्य सूक्ष्म परीक्षण करण्यात आले आहे.
धरणाच्या मुख्य दगडी भिंतीमधून होत असलेली पाणीगळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने प्रस्तावात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. केंद्रीय जल अनुसंधान शाळा (पुणे) यांच्या क्षेत्रीय पाहणीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
....
अहवालाप्रमाणे दगडी धरणावर सिमेंट गाउंटिंग, उभ्या बाजूस शॉर्टकिट, मूलभूत सुविधांची उभारणी, दुरुस्ती करणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तर, विश्रामगृह, सांडवा भिंत, आधुनिक भूकंपमापन केंद्र, निळवंडेप्रमाणे नवीन डिझाइन पद्धतीने भंडारदरा जलाशयाची कामे होणार आहेत.
- गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, भंडारदरा