१२ हजाराच्या व्याजापोटी महिलेकडून केले ९५ हजार वसूल; जवळे येथे सावरकाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 12:08 PM2020-06-10T12:08:34+5:302020-06-10T12:09:55+5:30
व्याजाने रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या जवळे येथील प्रकाश उर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे या सावकाराच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेला बारा हजार रुपये व्याजाने देऊन त्यापोटी तिच्याकडून सुमारे ९५ हजार रुपयांची वसुली केल्याचे समोर आले आहे.
पारनेर : व्याजाने रक्कम देऊन बेकायदेशीरपणे सावकारी करणा-या जवळे येथील प्रकाश उर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे या सावकाराच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका महिलेला बारा हजार रुपये व्याजाने देऊन त्यापोटी तिच्याकडून सुमारे ९५ हजार रुपयांची वसुली केल्याचे समोर आले आहे.
जवळे येथील तक्रारदार सुनंदा हरिभाऊ दरेकर यांनी याबाबत सहकार निबंधकांकडे तक्रार दिली आहे. जवळे येथील प्रकाश कोठावळे या सावकाराने ४ आॅक्टोबर २०१९ ते २४ एपिल २०२० या कालावधीत १२ हजार रुपये आपल्याला दहा टक्के व्याजाने दिले होते. त्या रकमेचे व्याजापोटी त्याने आतापर्यंत ९५ हजार रुपये वसूल केले.
या दरम्यान सावकार कोठावळे याने आणखी उर्वरित सात हजार पाचशे रुपयांऐवजी पंधरा हजार रुपयाची मागणी केली. दरेकर यांनी ते पैसे न दिल्याने सावकार प्रकाश कवठाळे याने एकनाथ सालके यांच्याकडून तीस हजार रुपये दरमहा दहा टक्के शेकडा याप्रमाणे व्याजाने घेऊन सदरचे पैसे अर्जदार यांना भरण्यास सांगितले. असे वेळोवेळी ९५ हजार हजार वसूल केले, असे तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरुन सहकार अधिकारी तात्याभाऊ भोसले यांनी या बेकायदेशीर सावकारी करणाºया प्रकाश कोठावळे याच्या विरोधात पारनेर पोलिसात फिर्याद दिली.
यावरुन पारनेर पोलिसांनी प्रकाश कोठावळे या सावरकाराविरुध्द सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे पुढील तपास करीत आहेत.