ग्रामसेवकांच्या ९६ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:20 AM2021-02-14T04:20:20+5:302021-02-14T04:20:20+5:30

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व काराभारावर त्याचे नियंत्रण असते. ग्रामपंचायतमधील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची ...

96 Gram Sevak posts vacant | ग्रामसेवकांच्या ९६ जागा रिक्त

ग्रामसेवकांच्या ९६ जागा रिक्त

ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व काराभारावर त्याचे नियंत्रण असते. ग्रामपंचायतमधील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे, विविध शासकीय योजना राबवणे, आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत ठेवणे, ग्रामसभा, मासिक सभा बो‍लविणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर वसूल करणे, ग्रामपंचायत हद्दीतील जमीन, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्ययावत ठेवणे, जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी करणे अशी अनेक कामे ग्रामसेवकांना करावी लागतात. ग्रामस्थांना लागणारे विविध दाखले देण्यापासून ते विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ग्रामस्थांना ग्रामसेवकावर अवलंबून राहावे लागते.

नगर जिल्ह्यात एकूण १३१८ ग्रामपंचायती असून त्यातील ८५६ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आहेत, तर ३ हजार लोकसंख्येच्या पुढील गावांसाठी २१६ ग्रामविकास अधिकारी नियुक्त आहेत. शिवाय १६ ग्रामसेवक कंत्राटी आहेत. तरी अजूनही २४६ गावांसाठी ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे एकाच ग्रामसेवकाला दोन किंवा तीन गावांचा कारभार पहावा लागतो. ग्रामसेवकांसाठी हे अतिरिक्त काम आहेच, परंतु त्याहीपेक्षा ग्रामसेवकांअभावी ग्रामस्थांच्या कामांचा खोळंबा अधिक आहे. सद्या जिल्ह्यात २० टक्के गावांत ग्रामसेवक नाहीत. त्यामुळे उर्वरित पदे तातडीने भरावीत, अशी मागणी गावांतून होत आहे. २०१८नंतर ग्रामसेवक भरती झालेली नाही.

----------

कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामतीचे काय?

ग्रामसेवकाची नियुक्ती झाल्यानंतर त्याला १० हजार रुपये अनामत रक्कम पंचायत समितीकडे भरावी लागते. पुढे संबंधित तालुक्यातच तीन वर्षे सेवा केल्यानंतर ग्रामससेवकाला कायमस्वरूपी नियुक्ती मिळते. त्यावेळी त्याची अनामत रक्कत परत करावी लागते. परंतु अनेक ठिकाणी या अनामत रकमा ग्रामसेवकांना वर्षानुवर्षे दिल्या जात नाहीत. अशी किती रक्कम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे जमा आहे, याची आकडेवारी संबंधित विभागाकडे नाही. ती पंचायत समिती स्तरावर असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे म्हणणे आहे.

-------------

एकूण ग्रामपंचायती - १३१८

नियुक्त ग्रामसेवक - ८५६

रिक्त ग्रामसेवक - ९६

नियुक्त ग्राम विकास अधिकारी - २१६

रिक्त ग्रामविकास अधिकारी - ३७

Web Title: 96 Gram Sevak posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.