कर्जत तालुक्यात आरटीईच्या ९६ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:20+5:302021-02-27T04:27:20+5:30
सिद्धटेक : आरटीईसाठी (बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार) कर्जत तालुक्यात १९ शाळा पात्र आहेत. त्यामध्ये प्रवेशासाठी ९६ जागा ...
सिद्धटेक : आरटीईसाठी (बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार) कर्जत तालुक्यात १९ शाळा पात्र आहेत. त्यामध्ये प्रवेशासाठी ९६ जागा उपलब्ध आहेत. तीन मार्चपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसाहाय्यित शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशस्तरावर पंचवीस टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या जागेवर प्रवेशित विद्यार्थ्यास इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिकवले जाते. त्यास कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी लागत नाही. या प्रवेश प्रक्रियेसाठी ३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
ज्या बालकांचे वय ३० डिसेंबर २०२१ रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहे, अशी बालके प्रवेश घेऊ शकतात. वंचित घटकातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, एसबीसी या प्रवर्गातील बालकांसाठी वडिलांचा जातीचा दाखला व बालकाचा जन्मतारखेचा दाखला, दुर्बल घटकांकरिता जनरल व ईडब्लूएस या प्रवर्गातील बालकांसाठी वडिलांचा तहसीलदार यांनी दिलेला एक लाखाच्या आत उत्पन्न असलेला दाखला. बालकाचा जन्मतारखेचा दाखला आवश्यक आहे.
कर्जत तालुक्यात हे प्रवेश देण्यासाठी १९ शाळा पात्र आहेत. या शाळांमध्ये ९६ जागा यासाठी राखीव आहेत. शाळा निवडताना एक बालक १० शाळांना पसंतीक्रम देऊ शकतात. या योजनेंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील पात्र बालकांनी जास्तीत जास्त संख्येने प्रवेश घ्यावेत, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी मीना शिवगुंडे यांनी केले आहे.