घरावर झाड कोसळल्याने २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील घटना
By रोहित टेके | Published: April 29, 2023 05:04 PM2023-04-29T17:04:53+5:302023-04-29T17:07:00+5:30
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली.
कोपरगाव : घरावर बाभळीचे भले मोठे झाड कोसळून घरात बसलेल्या तरुणाचा त्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात घडली. दत्तात्रय संजय मोरे असे मृत तरुणाचे नाव असून तो शेतमजुरी आणि मालवाहू रिक्षा चालवण्याचे काम करीत होता. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यातून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. अशातच ब्राम्हणगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला बाहेर काढून कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत झाल्याचे जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस अधिकाऱ्यासह कोल्हे कारखान्याची यंत्रणा मदतीस पोहोचली होती. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत दत्तात्रय याच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे. दत्तू हा घरात एकुलता एक कमावता मुलगा असल्याने त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घटनास्थळी भेट देत मोरे कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच आमदार अशितोष काळे यांनी देखील मोरे कुटुंबाला शासनाची मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.