सैनिकांच्या न्याय, हक्कांसाठी मोठा लढा उभारणार - अशोक चौधरी
By साहेबराव नरसाळे | Published: April 11, 2023 04:09 PM2023-04-11T16:09:32+5:302023-04-11T16:10:52+5:30
पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे.
अहमदनगर : देशाच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात. वेळप्रसंगी बलिदान देतात. सैनिकांच्या त्याग व समर्पित वृत्तीमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहेत. मात्र सैनिकांची उपेक्षा आणि अवहेलना होते. पेन्शनबाबत सरकारने अन्यायकारक आणि चुकीचे धोरण अवलंबविले आहे. पेन्शन हा प्रत्येक लोकसेवकाचा हक्क आहे. मात्र, तो हक्क डावलला जात असून सर्वच माजी सैनिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे याविरोधात मोठा लढा उभारणार आहे, असा निर्धार महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले.
इसळक निंबळक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य प्रवक्ते एस. के. आठरे, संजय म्हस्के, कॅप्टन शेख, निंबळक विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास कोतकर, संदीप महाराज कळसे, निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर, इसळकच्या सरपंच छाया गेरंगे, निंबळक सेवा सोसायटीचे संचालक पोपट खामकर, शेतकरी संघटनेचे संदीप गेरंगे, भाऊसाहेब कोतकर, उद्योजक बाळासाहेब साठे, बी. एम. कोतकर, आदी उपस्थित होते.
त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष एकनाथ आडसुरे यांनी निंबळक शाखेचा गत वर्षातील कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले की, ‘पहिल्या वर्षात नियोजित उपक्रम आणि कार्यक्रम योग्य पद्धतीने आणि समाधानकारक प्रतिसादाने पार पडले आहेत. आगामी काळात आणखी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे.’ प्रवक्ते एस. के. आठरे यांनी गुणवंत विद्यार्थी आणि शहिदांच्या पत्नींचा ‘वीर नारी’ गौरव करण्याची सूचना मांडली. उपस्थितांनी एकमताने या सूचनेचे स्वागत केले.
कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे सचिव शिवाजी सोनवणे, मारुती ताकपेरे, शरद कोरडे, सुनील कोतकर, आबासाहेब कोतकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गेरंगे यांनी केले. आभार अशोक कोतकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.