Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 09:31 PM2022-02-12T21:31:06+5:302022-02-12T23:40:06+5:30

आज राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. 

A decision will be taken tomorrow regarding the hunger strike against the decision to sell wine, said social activist Anna Hazare. | Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे

Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे

मुंबई/ अहमदनगर: महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित उपोषणाचा इशारा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर आज राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. 

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह निर्णय आणि अंमलबजावणीबाबत अण्णांना माहिती देण्यासाठी राळेगणसिद्धी येथे आल्या होत्या. सुमारे तीन तास वल्सा नायर सिंह यांनी अण्णा हजारेंसोबत चर्चा केली. 

सरकारने वाईन विक्री संदर्भात निर्णय घेतला असला तरी अंमलबजावणी करण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये मुख्यतः राज्यातून या निर्णयाबाबत असलेल्या हरकती जाणून घ्यायच्या आहेत, अशी माहिती वल्सा नायर सिंह यांनी अण्णा हजारेंना दिली. वल्सा नायर सिंह यांनी दिलेल्या माहितीनंतर, आपलं ५० टक्के समाधान झाल्याचं सांगत उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार असल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. तसेच किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय रविवारी घेणार असल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते, असं अण्णा हजारे यांनी याआधी म्हटलं होतं. तसेच मुख्यमंत्र्यांना याबाबतचा पत्र व्यवहार करुन अण्णांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

शेतकऱ्यांचेच हित पहायचे असेल तर गोरगरीब, सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमी भाव द्यायला हवा. पण त्याकडे रीतसर दुर्लक्ष करून अशा प्रकारे वाईनची खुली विक्री करून एक वर्षात १ हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दीष्ट ठेवणारे सरकार यातून नेमके काय साध्य करणार?, असा सवालही अण्णांनी विचारला होता.

Web Title: A decision will be taken tomorrow regarding the hunger strike against the decision to sell wine, said social activist Anna Hazare.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.