आमदार, खासदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन हमीभाव द्या; शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:20 PM2023-03-15T19:20:31+5:302023-03-15T19:22:00+5:30
भरमसाठ वेतन असतानाही जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत.
घारगाव (अहमदनगर) : भरमसाठ वेतन असतानाही जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेला शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी खासदार, आमदार व सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन कमी करुन उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनीयोग शेतमालाच्या हमीभावासाठी करण्याची मागणी तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी ऐन परीक्षेच्या काळात शाळा व सरकारी कार्यालये बंद ठेवून कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यात जुनी पेन्शन योजना लागू होणारे कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या घटकांच्या मासिक वेतनावर सरकारच्या तिजोरीतून खर्च होणाऱ्या रकमेच्या अवघ्या २५ टक्के रकमेत अनेक सुशिक्षीत बेरोजगार तरुण काम करण्यास तयार आहेत. पाच वर्ष आमदार, खासदार राहिलेल्यांना तसेच आत्ताही सत्तेत असलेल्या आमदार, खासदारांना वेतनासह भरमसाठ भत्ते शासनाकडून मिळत आहेत. त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा विचार करता त्यांना पेन्शनची गरज आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
या सर्वांच्या पेन्शनचा विचार करता ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावासाठी खर्च झाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. अस्मानी व सुलतानी संकटांनी पिडलेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, आजवर त्यांनी अनेकदा हमीभावासाठी आवाज उठवला असूनही सरकारने ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. पूर्ण दाबाने व दिवसा विजपुरवठा होत नसूनही, विजबिल न भरल्यास विजवितरण कंपनी रोहीत्र बंद करते. शेतमालाचे बाजारभाव कोसळल्याने उभ्या पिकात नांगर फिरवला जात आहे.
अशा परिस्थितीत मुळात भरभक्कम वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी हजारो लाखो रुपयांची पेन्शन कमी करुन, उपलब्ध पैशांचा विनियोग शेतमालाच्या हमीभावासाठी करण्याची मागणी पठार भागातील घारगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. याच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते अजीत पवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते शरद पवार, जिल्हाधिकारी, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना पाठवल्या आहेत. निवेदनावर महेश आहेर, मंगेश कान्होरे, सुरेश आहेर, किशोर डोके,सुरेश आहेर,नंदू कान्होरे, सतिश आहेर, अजित आहेर, प्रभाकर शेळके, मुसाभाई शेख, रामदास आहेर, बाळासाहेब ढोले, आदींसह ५५ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.