गोळीबाराची घटना घडली, पण किरकोळ तक्रार दाखल केली!
By सचिन धर्मापुरीकर | Published: December 6, 2023 06:12 PM2023-12-06T18:12:33+5:302023-12-06T18:13:04+5:30
पोलिस करतात काय? माजी नगराध्यक्ष वहाडणे यांचा पत्रकार परिषदेत सवाल
कोपरगाव (जि. अहमदनगर) : "कोपरगाव शहरात पोलिस आणि गुंड दलालांच्या अभद्र युतीमुळे अवैध धंदे बिनबोभाट सुरु आहेत. त्यावर पोसल्या जाणाऱ्या गुंडांचा नंगानाच सुरु आहे. ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले आणि देशमुख आपण करता तरी काय," असा सवाल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उपस्थित करीत सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे, याबाबत पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे वहाडणे यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव शहर आणि तालुक्यामध्ये बोकाळलेल्या अवैध धंदे आणि गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांवर आरोप केले. वहाडणे पुढे म्हणाले की, शहरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली. त्याची किरकोळ तक्रार दाखल करण्यात आली. येवला रस्त्यावरील हॉटेलमध्ये व्यवस्थापकाला भोसकून गंभीर जखमी करण्यात आले. येवला रस्त्यावरीलच व्यापाऱ्यांची ७ दुकाने रात्रीतून फोडण्यात आली. मात्र, त्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी तक्रार दाखल करू दिली नाही. तक्रार दाखल करायची असल्यास खरेदी बिले दाखवा, पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागतील अशी भीती दाखवली जाते. त्याही पलीकडे गंभीर गुन्ह्यातील आरोपींना मोकाट सोडण्यासाठी जागेवरच तोडपाणी केले जात आहे.
शहर आणि तालुक्यातील दारू, मटका, जुगार, ऑनलाईन गेमिंग वाल्यांकडून दर महिन्याला हप्ते गोळा केले जात असल्याचेही ते म्हणाले. या अवैध धंदे करणाऱ्यांकडून हप्ते गोळा करण्यासठी त्यांच्यातीलच काहींना दलाल (एजेंट) म्हणून नेमले आहे. आणि हेच एजेंट दिवसभर पोलीस स्टेशनच्या आत बाहेर ठाण मांडून असतात. यावर वेळीच कारवाई न झाल्यास आपण जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे संबधित अधिकाऱ्यांची नावानिशी आणि पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे वहाडणे यांनी स्पष्ट केले.
... अन्यथा जनआंदोलन
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील एक उपनिरीक्षक तर जागेवर प्रकरण मिटविण्यासाठी फार तत्पर असून आपल्या गाडीमध्ये पैसे नेवून ठेवा तरच प्रकरण मिटवतो असे सांगत गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात कुप्रसिद्ध झाले आहेत. शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखा, जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. अन्यथा जनआंदोलन करावे लागेल असा इशाराही वहाडणे यांनी दिला.