कोपरगावात उभ्या कारने घेतला पेट; लाखोंचे नुकसान
By रोहित टेके | Published: April 5, 2023 06:42 PM2023-04-05T18:42:07+5:302023-04-05T18:42:37+5:30
मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने अचानक पेट घेतला.
कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यातील संवत्सर शिवारात मुंबई नागपूर महामार्गावर उभे असलेल्या महिंद्रा काँन्टो कारने बुधवारी (दि.५) दुपारी अचानक पेट घेतला. सुदैवाने कारमध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली. मात्र, कार जळून खाक झाल्याने बाबासाहेब ठाकरे या शेतकऱ्याचे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाबासाहेब ठाकरे (रा.भोजडे चौकी) हे बुधवारी दुपारी पुतण्या किरण यांच्या बरोबर भोजडे चौकी येथून संवत्सर शिवारातील आपल्या शेतावर शेती कामासाठी गेले होते.
त्या ठिकाणी मुंबई- नागपूर महामार्गाच्याकडेला त्यांनी महिंद्रा काँटो कार (क्र.एम.एच. १५ इपी ७०८६ ) ही उभी केली. काही वेळातच उभ्या कारने अचानक पेट घेतला. ठाकरे यांच्या लक्षात आल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या आणि कोल्हे कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळवले. यावेळी दोन्ही अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली तोपर्यंत काल पूर्णपणे जळून खाक झाली होती. सुदैवाने कार मध्ये कोणी नसल्याने जीवित हानी टळली मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर आग विझवण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद अग्निशमन दलाचे फायरमन प्रमोद सिंनगर, सागर काटे, चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.