वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला
By शेखर पानसरे | Published: August 4, 2023 08:55 PM2023-08-04T20:55:51+5:302023-08-04T20:56:05+5:30
पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाख ३ हजार ७८४ रुपये किमतीचे पाईप चोरीला गेल्याचे गुरुवारी (दि.०३) दुपारी चार वाजेच्या सुमारास समोर आले. या प्रकरणी शुक्रवारी (दि.०४) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जलजीवन मिशन योजनेचे पाईप चोरीला गेल्या प्रकरणी संगमनेरातील आर. एम. कातोरे ॲण्ड कंपनी येथे अभियंता म्हणून नोकरीला असलेल्या अंकेत राजेंद्र वाकचौरे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. वेल्हाळे येथील भांडमळा टाळीजवळ निमगाव भोजापूर व इतर तीन गावे या कामाअंतर्गत जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. तेथे ४७० पाईप भांडमळा टाकीजवळ वेल्हाळे येथे ठेवले होते.
देखरेखीसाठी सुरक्षा रक्षक नेमलेले नसल्याने अभियंता वाकचौरे हेच अधूनमधून पाहणी करण्यासाठी जात होते. एका पाईपची लांबी ५.५ मीटर १०० एमएम डीआयके ७ डायचे, ४ इंची पाईप एका पाईपचे वजन अंदाजे ११५ किलो आणि किमत ९ हजार ३९१ रूपये इतकी आहे. एका पाईपचे वजन साधारण ११५ किलो असताना आणि एवढ्या मोठ्या संख्येने ठेवलेले पाईप नेमके कुणी चोरले यांचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जे. एन. दहातोंडे अधिक तपास करीत आहेत.