सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरात झाली चोरी, सोन्याचे दागिने लांबविले
By शेखर पानसरे | Published: December 9, 2023 07:29 PM2023-12-09T19:29:37+5:302023-12-09T19:29:52+5:30
संगमनेरच्या उपनगरातील घटना
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सेवानिवृत्त शिक्षकाचे बंद घराच्या दरवाजा कोंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. १ लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.०९) सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास समोर आली असून ती संगमनेरच्या गणेशनगर येथील आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोपान विश्वनाथ फटांगरे (वय ६६, सेवानिवृत्त शिक्षक, रा. गणेशनगर परिवार किराणा गल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. शुक्रवारी (दि.०८) सकाळी ७ ते शनिवार (दि.०९) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षक फटांगरे यांचे घरच्या दरवाजा कोंडा उचकटून आत प्रवेश केला. १ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा तोळे सोन्याचे गंठण, ६० हजार रुपये किमतीच्या तीन तोळे सोन्याच्या दोन ठुशी व १० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम कानातील झुबे असा एकूण १ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करत आहेत.