शाळकरी मुलाकडून उद्धव ठाकरेंना शिदोरी
By सचिन धर्मापुरीकर | Published: September 8, 2023 04:48 PM2023-09-08T16:48:39+5:302023-09-08T16:48:55+5:30
दुष्काळाजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आले होते.
कोपरगाव (अहमदनगर) : दुष्काळाजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आले होते. यावेळी त्यांना एका शाळकरी मुलाने आपल्या आजीने बनवलेली बाजरीची भाकरी आणि ठेचा अशी कपड्यात बांधलेली शिदोरी भेट दिली. ठाकरे यांनीही मोठ्या आत्मीयतेने शिदोरीचा स्विकार केला व मुलाची विचारपूस केली.
दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे शुक्रवारी दुपारीआले होते. येथे आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील सहावीत शिकणाऱ्या कार्तिक नवनाथ वर्पे या शाळकरी मुलाने उद्धव ठाकरे यांना शिदोरी भेट दिली. या शिदोरीत त्याच्या आजीने चुलीवर बनवलेली बाजरीची भाकरी, ठेचा आणि लोणचे होते. रुमालात बांधलेली शिदोरी उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने हातात घेत कार्तिक वर्पे यास तू मला शिदोरी आणली पण, तू जेवण केले का अशी विचारणा केली. आज शाळेत का गेला नाही असे विचारले. त्यावर तुम्हाला भेटायचे होते, म्हणून शाळेत गेलो नाही असे त्याने सांगितले. कार्तिकने सकाळ पासून चुलते दत्तात्रेय वर्पे यांच्याकडे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाण्याचा आग्रह धरला होता. चुलते हो म्हणताच त्याने भेट म्हणून शिदोरी बांधून घेतली होती. ती उद्धव ठाकरे यांनी दिली.