समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पीपीई कीट घालून अनोखे आंदोलन

By चंद्रकांत शेळके | Published: November 7, 2023 06:51 PM2023-11-07T18:51:33+5:302023-11-07T18:51:44+5:30

राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी हे आंदोलन केले.

A unique movement by Community Health Officers wearing PPE | समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पीपीई कीट घालून अनोखे आंदोलन

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे पीपीई कीट घालून अनोखे आंदोलन

अहमदनगर : शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करून समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर पीपीई कीट घालून अनोखे कामबंद आंदोलन केले.

राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकाच दिवशी हे आंदोलन केले. अहमदनगर जिल्ह्यातही हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात हे समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. मात्र त्यांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने आहे. जिल्ह्यात सध्या ४९० समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. शासकीय सेवेत बिनशर्त समायोजन करून समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन मिळावे, आरआर लागू करून समुदाय आरोग्य अधिकारी हा संवर्ग अधिकृत करण्यात यावा, ग्रेड पे नुसार वेतन लागू करण्यासह विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर हे लाक्षणिक काम बंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शैलेश पवार, उपजिल्हाध्यक्ष रेश्मा शेख, सूर्यकांत यादव, सचिव अक्षय पठारे, सहसचिव डॉ. दिनेश भोज, कोषाध्यक्ष सागर गायकवाड, कार्याध्यक्ष डॉ. मुकुंद गमे आदींसह प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यस्तरीय समायोजन कृती समिती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. सर्व डॉक्टरांनी कोरोना काळात चोख कर्तव्य बजावले. याची आठवण आणून काही डाॅक्टर आंदोलकांनी पीपीई किट घालून ‘ओळखले का आम्हाला, आम्ही कोविड योद्धे’ असे लक्षवेधी फलक झळकावले. दिवाळीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर दिवाळीनंतर पुन्हा जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: A unique movement by Community Health Officers wearing PPE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.