‘आधार’ने स्वीकारले रेवणनाथचे शैक्षणिक पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:35+5:302021-09-26T04:23:35+5:30
संगमनेर : कोरोनामुळे शिक्षणापासून वंचित असलेला रेवणनाथ नवले हा ११ वर्षाचा मुलगा कोणत्याही यांत्रिक साहित्याचा वापर न करता देवी-देवता, ...
संगमनेर : कोरोनामुळे शिक्षणापासून वंचित असलेला रेवणनाथ नवले हा ११ वर्षाचा मुलगा कोणत्याही यांत्रिक साहित्याचा वापर न करता देवी-देवता, महापुरुषांचे फोटो पाहून मातीची हुबेहूब मूर्ती बनवतो, त्यावर सुंदर रंगकाम करतो. गृहभेटीदरम्यान त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांची कलाकुसर हेरली. त्यांनी रेवणनाथ मूर्ती बनवत असतानाचा व्हिडिओ बनविला, सोशल मीडियाद्वारे तो अनेकांना पाठवत त्याच्यासाठी मदतीचे आवाहन केले. आधार फाउंडेशनने रेवणनाथचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
व्हिडिओतून रेवणनाथ नवले हा शिक्षणापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाइन शिक्षण चालू आहे. रेवणनाथचे कुटुंब भूमिहीन. घरात पाच माणसे, अपघाताने दिव्यांग झालेले वडील घरीच असतात. आई मोलमजुरी करते. अशा परिस्थतीत ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाइल घेण्यासाठी पैसे कुठून आणणार? उपजत मूर्तीकला अवगत असलेला रेवणनाथ वयाने लहान आहे. कोणतेही यांत्रिक साहित्य न वापरता फोटो पाहून मातीपासून हुबेहूब मूर्ती बनवून ती रंगविण्याचे कसब त्याच्या अंगी आहे. त्याचा मूर्ती बनवत असतानाचा व्हिडिओ आधार फाउंडेशनचे शिलेदार बाळासाहेब गडाख, समन्वयक अनिल कडलग यांच्या पाहण्यात आला. त्यांनी फाउंडेशनच्या समन्वयकांशी चर्चा केली. सुरुवातीला त्याच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचवले. सर्व परिस्थिती समजावून घेत आधार समन्वयकांनी त्याची आधार शैक्षणिक दत्तक-पालक योजनेसाठी निवड केली. कॉर्नर मोबाइल शॉपीचे संचालक संजय अभंग यांच्या सहकार्याने रेवणनाथला ऑनलाइन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाइल घेतला. शालेय व इतर साहित्यांसह फाउंडेशनच्या समन्वयकांनी मालदाड गाठले. सोबत शिल्पकार सुनील मादास होते. त्यांनी रेवणनाथची मूर्तीकला पाहून त्याला सर्व तांत्रिक बाबींसाठी मदत करण्याचे जाहीर केले. रेवणनाथच्या पुढील शिक्षणाची सर्व जबाबदारी आधार फाउंडेशनने स्वीकारली आहे.
फाउंडेशनचे समन्वयक सोमनाथ मदने, अनिल कडलग, बाळासाहेब गडाख, सुनील मादास, सुखदेव गाडेकर, सरपंच गोरक्ष नवले, श्रमशक्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास डोंगरे, गोपीनाथ नवले, नीलेश नवले, सचिन नवले, जालिंदर नवले आदी यावेळी उपस्थित होते.