आधार साईंचा... 90 वर्षीय पत्रलेखक सुधाकर वखारे शिर्डीच्या साई आश्रयाला
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 3, 2023 11:55 AM2023-10-03T11:55:27+5:302023-10-03T15:10:24+5:30
सुधाकर वखारे हे शिक्षकी पेशातील. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहमदनगर) : नातं मनुष्याला आधार देत असते पण जे लोक निराधार आहेत त्यांच्या जीवनात शिर्डीच्या गणेश दळवी यांनी आनंद निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्यांच्या साई आश्रयामध्ये कोपरगावचे ९० वर्षीय पत्रलेखक सुधाकर तात्याबा वखारे उर्फ गुरु यांना दिसायला कमी झाल्यामुळे आणि कुणाचाही आधार नसल्यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल करून आधार दिला आहे.
सुधाकर वखारे हे शिक्षकी पेशातील. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत. समाजाने शिंपी ही त्यांची ओळख. कर्मवीर शंकरराव काळे कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात गोडाऊन विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली होती. विविध वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवण्याचा छंद होता. आकडेमोड करण्यात ते फार तरबेज असायचे. तरुणपणाच्या काळात त्यांनी पडेल ते काम केले. इंग्रजी या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. येवलेचे असतानाही त्यांचा अनंत काळ कोपरगावच्या वास्तव्याला होता.
इंटरनेट मोबाईल येण्याच्या अगोदर कोपरगाव येथील अनेक नामांकित पत्रकारांच्या बातम्या, जाहिरातीची रोख रक्कम, फोटो ब्लॉक, आदी तत्सम काम घेऊन जाण्यात ते सतत पुढाकार घ्यायचे. नगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरपासून ते थेट मुंबई, नवी दिल्ली पर्यंतच्या संपादकापर्यंतचा, जाहिरात व्यवस्थापकांशी त्यांचा संपर्क असायचा. स्टेट्समन या इंग्रजी दैनिकात त्यांनी केलेल्या लिखाणाला पुरस्कारही मिळालेला आहे. सध्याच्या समाजमाध्यमाच्या काळाच्या अगोदर त्यांनी कित्येक वेळा असंख्य योजनांचे परिपत्रके शहरात, गावागावात, तालुक्यात वाटून अनेक वेळा संबंधित माहितीपत्रके भिंतीवर चिटकवण्याचे देखील काम केलेले आहे. डॉक्टर, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध समाज संघटनांचे अध्यक्ष, चित्रपट पोस्टर बॉय आदि सोबत त्यांची मैत्री होती. त्यामुळे त्यातून मिळणारे काम त्यांच्या चरितार्थाचे साधन होते., यात मिळणाऱ्या पैशात ते समाधान मानत. विविध वर्तमानपत्रातील योजनांमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. याशिवाय लॉटरी तिकिटे विकूनही त्यांनी आपला चरितार्थ सांभाळला होता.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
कोपरगावच्या कापड बाजारातील जुन्या पोस्ट जवळ जिन्याखाली नेहमी वास्तव्य असायचे. कुशाग्र बुद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. दाढी वाढलेली, कळकट, मळकट कपडे यामुळे त्यांचा अवतार विचित्र झाला होता. त्यांच्या डोळ्यावर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली होती, मात्र वय जास्त झाल्यामुळे त्यांची नजर आणखीन कमजोर झाली, परिणामी त्यांच्या जीवनाची आबाळ होऊ लागली. त्यामुळे शिर्डीच्या साई आश्रयात त्यांची रवानगी मुंबादेवी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड, राजेंद्र शिंगी, गिरीश झंवर, गोपाळ वैरागळ, दिनेश गवळी व परिसरातील नागरिकांनी केली. त्यांचे पुढील आयुष्य सुखाचे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.