Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 08:51 PM2021-10-31T20:51:39+5:302021-10-31T20:52:50+5:30

Aaditya Thackeray: महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

aaditya thackeray said maha vikas aghadi govt is like the best of eleven team | Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray: “आमचे महाविकास आघाडी सरकार म्हणजे ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम”: आदित्य ठाकरे

अहमदनगर:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत असले तरी महाविकास आघाडीमधील नेते मंडळी तिन्ही पक्षांचे सरकार कसे उत्तम काम करत आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. यात आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भर पडली आहे. महाविकास आघाडी म्हणजे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते. या मेळाव्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. बाळासाहेब थोरात यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन मिळत आले आहे आणि त्याच उद्देशाने येथे आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आमची महाविकास आघाडी म्हणजे  ‘बेस्ट ऑफ ११’ची टीम

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचे एकमेकांशी साखरेएवढे गोड संबंध आहेत. सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी, तसेच तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले आहेत. या तीन पक्षांत शहरी आणि ग्रामीण भागात कामाचा चांगला अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे क्रिकेट टीमप्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वातावरण चांगले असले की विकासाला वाव मिळतो. महाविकास आघाडीच्या सकारमधील तिन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण आहे. मंत्री झाल्यापासून ज्येष्ठांकडून शिकतो आहे. अधिवेशनातही ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते. आता कोरोना संकट कमी झाल्याने राज्यभर फिरणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही

मुळात शिवसेनेचा स्वभावच असा आहे की, आम्ही पोटात एक आणि ओठात एक असं करत नाही. कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही. आमचे मन साफ आहे. त्यामुळे आधीपासूनच सर्वांशी संबंध चांगले होते आणि त्याचाच उपयोग झाला व आम्ही एकत्र आलो. तीन अनुभवी पक्ष यामध्ये एकत्र आले आहेत. शिवसेनेला प्राधान्याने शहरी भागातील अनुभव आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ग्रामीण भागातील जास्त अनुभव आहे. त्यामुळे या अनुभवांचा फायदा शहरी आणि ग्रामीण भागातील धोरणे राबविणे आणि अंमलबजावणी करण्यासाठी होत आहे. त्यामुळे राज्यात प्रगती होत राहणारच. ग्रामीण भागातील कामे मला समजून घ्यायची आहेत, त्याची आमच्या मतदारसंघात कशी अंमलबजवणी करता येईल, ते पहायचे आहे. फक्त पुढे जाण्यात अर्थ नाही, कसे पुढे जायचे, याचे नियोजन करून पुढे गेले पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
 

Web Title: aaditya thackeray said maha vikas aghadi govt is like the best of eleven team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.