विकासाच्या मुद्यावर ‘आप’ने साधला जनतेशी संवाद
By अरुण वाघमोडे | Published: June 17, 2023 04:02 PM2023-06-17T16:02:23+5:302023-06-17T16:02:46+5:30
सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला.
अहमदनगर: नगर शहरातील विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम आदमी पार्टीच्यावतीने स्वराज्य संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरातील विविध भागात आपच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद बैठका घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. तर नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेऊन आपच्यावतीने दिल्लीच्या धर्तीवर करण्यात आलेल्या विकासाची माहिती देण्यात आली.
सावेडी येथील पारिजात चौकातून शनिवारी स्वराज्य संवाद यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी पक्षाचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, गौतम कुलकर्णी, दिलीप घुले, गणेश मारवाडी, संपत मोरे, रवी सातपुते, प्रकाश फराटे आदींसह नागरिक उपस्थित होते.
प्रा. अशोक डोंगरे म्हणाले आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले आहे. जातीय राजकारणाला पर्याय देण्यासाठी केंद्र व राज्यात आपने पर्याय उभा केला आहे. दिल्लीत शिक्षण, व्यापार, आयटी व उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. अनेक खर्चिक सोयी-सुविधा नागरिकांना तेथे मोफत मिळत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात ही व्यवस्था व विकास दिसत नसून, येथे फक्त जातीय राजकारण सुरु आहे. विकास साधण्यासाठी जनतेने आपकडे सत्तेची सूत्र देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर या ठिकाणापासून रायगड पर्यंत निघालेल्या स्वराज्य स्वराज्य यात्रेला लाभलेल्या जनतेच्या प्रतिसादाची माहिती दिली.