जलयुक्त शिवार योजनेत अपहार; मजले चिंचोलीच्या तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवकाचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 04:41 PM2020-02-05T16:41:59+5:302020-02-05T16:42:56+5:30
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला.
केडगाव : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम मंजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच आणि ग्रामसेवकावर मंगळवारी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर पंचायत समितीच्या विस्तार अधिका-यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट ज-हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी आशिमा मित्तल यांची दिलेल्या आदेशानुसार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम तुपे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, १ जानेवारी २०१६ ते १ डिसेंबर २०१८ या कालावधीत मजले चिंचोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट ज-हाट यांनी संगनमताने जेऊर येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने संयुक्त खाते उघडले होते. त्याचा कोणताही हिशोब न ठेवता या खात्यातून तब्बल १७ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा अपहार केला. पाणीपट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातूनही १ लाख ५८ हजार ५३० रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी केली असता अपहार झाल्याचे उघडकीस आल्याने ही फिर्याद देण्यात आली आहे. या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत ज-हाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर हे करीत आहेत.