सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने ‘एसीसी अॅण्ड एस’चा गौरव
By Admin | Published: April 15, 2017 01:28 PM2017-04-15T13:28:51+5:302017-04-15T13:28:51+5:30
देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले.
अ मदनगर : देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. शनिवारी झालेल्या एका शानदार सोहळ्यात लष्कराचे उत्कृष्ट संचलन, रणगाड्यांचा ताफा अन् हेलिकॉप्टर, सुखोई हवाई विमानाच्या चित्तथरारक कसरतीने उपस्थित भारावले. येथील आर्मर्ड कार्प सेंटर अॅण्ड स्कूल या देशातील उत्कृष्ट लष्करी प्रशिक्षण संस्थेला शनिवारी सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रपती मानक देऊन गौरविण्यात आले. एसीसी अॅण्ड एसचे कमांडिंग आॅफिसर मेजर जनरल प्रवीण दिक्षित यांनी हा मानाचा ध्वज स्वीकारला. प्रथम सैनिकांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल पी. एम. हैरिज, लेफ्ट. जनरल डी. आर. सोनी आदी प्रमुख पाहुण्यांना सलामी दिली. राष्ट्रपतींचे मानक मिळणे हे कोणत्याही सैनिक तुकडीचा सर्वोच्च सन्मान व दुर्मिळ क्षण असतो. सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम हे निशान करते. अहमदनगरमध्ये १९४८मध्ये एसीसी अॅण्ड एसची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या ६९ वर्षांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना हा सर्वोच्च बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. तत्पूर्वी जवानांनी शिस्तबद्ध संचलन केले. या संचलनात घोडेस्वार, लढाऊ रणगाडे, तसेच जवानांनी विविध कसरती दाखवत सैन्य सज्जतेची झलक दाखवली. याच दरम्यान, लढाऊ सुखोई विमान, तसेच हेलिकॉप्टरने आकाशातून ध्वजवहन करून आपले सामर्थ्य प्रदर्शित केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘फर्स्ट डे कव्हर’चे प्रकाशन झाले. एसीसी अॅण्ड एसच्या उत्कृष्ट कामगिरीचे त्यांनी आपल्या भाषणात कौतूक केले.