नगर-औरंगाबाद हायवेवर अपघात : एक महिला ठार, चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:54 PM2019-05-09T18:54:44+5:302019-05-09T18:54:51+5:30
नगर - औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे स्कोडा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
केडगाव : नगर - औरंगाबाद महामार्गावर जेऊर येथे स्कोडा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली आहे तर चार जण जखमी झाले आहेत.
औरंगाबादवरुन पुण्याच्या दिशेला चाललेल्या कारचालकाचे (एम.एच.०२, बी.वाय- १९५५) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या कडेला असलेल्या शेताच्या कंपाऊंडला धडक देऊन खड्ड्यात पलटी झाली. हा अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लिगाडे वस्ती येथे घडला. यामध्ये लता दत्तात्रय ठाकूर (वय ६० रा.पुणे) या महिलेचा जागेवरच मृत्यु झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दत्तात्रय सारंग ठाकूर, आश्विन प्रशांत ठाकूर, चंद्रशेखर ठाकूर, अनिता चंद्रशेखर ठाकूर (सर्व रा. पुणे) यांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त कार भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कार तीन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. जखमींना शरद तोडमल, अक्षय तोडमल, अर्जुन तोडमल, मयुर तोडमल यांच्यासह वस्तीवरील नागरीकांनी बाहेर काढुन उपचारार्थ नगर येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक गांगुर्डे यांनी पंचनामा केला.
रुग्णवाहिका वेळेवर पोहोचलीच नाही
जखमींना १०८ नंबरची रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने खाजगी वाहनाने रुग्णालयात पाठवण्यात आले. जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून एक किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झाला होता. जेऊर आरोग्यकेंद्रामध्ये १०८ रुग्णवाहिका दिलेली आहे. परंतु सदर रुग्णवाहिका कायम पुणे येथे पाठविण्यात येत असल्याने नगर औरंगाबाद महामार्गावर घडणा-या अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. नगर-औरंगाबाद महामार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने जखमींना तातडीने मदत मिळावी म्हणून जेऊर आरोग्यकेंद्रातील रुग्णवाहिका पुण्याला पाठविण्यात येऊ नये. याबाबत जेऊर ग्रामसभेने ठराव देखील घेतलेला आहे. तरी देखील जेऊर रुग्णवाहिका नेहमीच पुण्याला का पाठविण्यात येते. यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. जेऊर आरोग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका पुणे येथे गेल्याने अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी खाजगी वाहनाने जखमींना हलवावे लागल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली.
कायम अपघात घडूनही कार्यवाही नाही
नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपुल, जेऊर गाव मुख्य चौक, चापेवाडी तसेच गवारे वस्ती चौक येथे नेहमीच अपघात घडत आहेत. नागरिकांनी मागणी करुन देखील येथील अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभाग व संबंधित रस्ता बनविणा-या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.