श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी
By शिवाजी पवार | Published: May 30, 2023 02:47 PM2023-05-30T14:47:01+5:302023-05-30T14:47:23+5:30
अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.
अहमदनगर - श्रीरामपूर नेवासे महामार्ग अशोकनगर फाटा येथे सलग दोन दिवस अपघाताच्या घटना घडल्या. दुचाकी व कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.
मृताचे नाव कैलास लक्ष्मण धनवटे (वय ४५, रा. सूतगिरणी, श्रीरामपूर) असे आहे. सागर परदेशी हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कारचालक फरार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. बांधकाम कामगार धनवटे व परदेशी हे रात्री श्रीरामपूरच्या दिशेने जात होते. त्यांना कारने जोराची धडक दिली. त्यामुळे धनवटे व परदेशी रस्त्यावर कोसळले. नागरिकांनी तातडीने दोघांनाही शहरातील साखर कामगार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान धनवटे यांचा मृत्यू झाला.
नेवासे महामार्गावर रेल्वे उड्डाणपूल व हरेगाव फाटा या दरम्यान आठवड्याला दोन किंवा तीन अपघात घडत आहेत. येथे पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. मात्र तरीही बेशिस्त वाहतुकीवर त्यांचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली जात आहे.